भारताला नमविणाऱ्या इराणच्या विजयात मराठी वाटा

ज्ञानेश भुरे
Saturday, 25 August 2018

भारताविरुद्ध अंतिम सामना खेळताना एक भारतीय म्हणून दडपण होते हे मान्य करते. पण, मी येथे एक व्यावसायिक जबाबदारी घेऊन आले आहे हे मनावर बिंबवले होते. कुठल्याही परिस्थितीत भावनिक व्हायचे नाही हे स्वतःला बजावले. मीच जर डळमळीत झाले असते, तर आज या मुली सुवर्णपदक जिंकू शकल्या नसत्या. 
- शैलजा जैन, इराणच्या प्रशिक्षक

पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीतील पुरुष, महिला सुवर्णपदके इराणने मिळविली. आजपर्यंतची या खेळातील भारतीय सद्दी संपुष्टात आली आणि इराण एकदम प्रसिद्धिच्या झोतात आले. इराणच्या पुरुष खेळाडूंना प्रो लीगमधून अनुभव मिळाला, पण महिलांना भारतीय प्रशिक्षकाने घडवले. नाशिकच्या शैलजा जैन गेली चार वर्षे या संघबरोबर आहेत. प्रशिक्षक आणि प्रशिक्षण म्हणजे काय याचा खरा आनंद मला इराणमध्ये मिळाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

महिला कबड्डीची अंतिम लढत झाल्यावर त्यांच्याशी जाकार्ता येथे संपर्क साधला असता, त्यांनी दै. सकाळशी बोलताना आपला अनुभव मोकळेपणाने मांडला. त्या म्हणाल्या,""एखाद्या संघाला प्रशिक्षण द्यायचे म्हणजे काय याचा आनंद मला इराणमध्ये मिळाला. एन.आय.एस. प्रशिक्षक असल्यामुळे संघ कसा घडवायचा आणि त्यासाठी काय करायचे याचे सगळे नियोजन तयार होते. प्रशिक्षक म्हणून आवश्‍यक असलेल्या सर्व सुविधा मला त्यांनी पुरविल्या. संघासाठी स्वतंत्र आहारतज्ज्ञ, फिजिशियन आणि मानसोपचार तज्ज्ञाची मागणी केली. त्यांनी कसलेही आढेवेढे न घेता माझ्या सर्व अटी मान्य केला. खेळाडूंनीही साथ दिल्याने आज इराणच्या महिलांना आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देऊ शकले याचा शंभर टक्के आनंद झाला.'' 

नाशिकच्या रचना संघातून भक्ती कुलकर्णीसारख्या अनेक छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडू घडविणाऱ्या शैलजा जैन स्वतः जिजामाता पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकही आहेत. पण, त्यांच्यातील प्रशिक्षकला इराणमध्ये न्याय मिळाला. नाशिकमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून सेवेत असताना 2008 मध्ये सर्वप्रथम त्यांची इराणच्या प्रशिक्षकपदासाठी मुलाखत झाली होती. त्यांची निवड झाल्यामुळे काही कारणामुळे निवड होऊनही त्या इराणच्या प्रशिक्षक होऊ शकल्या नाहीत. मात्र, 2014 मध्ये सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांना पुन्हा इराणकडून विचारणा झाली आणि त्यांचा इराणबरोबरचा प्रवास सुरू झाला. त्या म्हणाल्या,""निवृत्त झाल्यावर माझ्यासमोर कसल्याच अडचणी नव्हत्या. मी त्यांना लगेच होकार दिला. पण, मुस्लिम देशात महिलांवर असणारी बंधने माहित असल्यामुळे संघ कसा घडवला जाणार याची भिती होती. दुसरी भिती म्हणजे मी शाकाहारी होते. या सगळ्यावर मात करण्याचे आव्हान होते. प्रत्यक्षात इराणमध्ये गेल्यावर आपोआपच सगळ्य शंका दूर झाल्या. त्यांनी मला पूर्ण सहाकार्य करण्याची तयारी दर्शविली आणि माझे काम सोपे झाले.'' 

आपल्या खेळाच्या प्रशिक्षणासाठी भारत सोडून जाताना कसे वाटले असे विचारले असता त्या म्हणाल्या,""हे बघा, महाराष्ट्रात मला प्रशिक्षक करा असा मी कधीच आग्रह धरला नव्हता. पण, महिला संघाला महिला प्रशिक्षक असाव्यात हीच मानसिकता आपल्याकडे नव्हती. त्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा करून स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान मी स्विकारले आणि ते साध्य करून दाखवले याचा आनंद आहे. मी इराणला प्रशिक्षक म्हणून जाणार तेव्हा कुणी माझी साधी दखलही घेतली नव्हती. पण, आज इराण विजेते ठरल्यावर माझा दूरध्वनी सतत खणखणत आहे. भारतातून कॉल्स येत आहेत आणि येथे वार्तांकनासाठी आलेले सगळे भारतीय प्रतिनिधी आमच्या प्रतिक्रियेसाठी आतुर होते.'' 

इराणमध्ये महिलांना असलेले प्राधान्य याचे मला कौतुक वाटले असे सांगून त्या म्हणाल्या,""मुस्लिम देशात महिलांवर बंधने आहेत पण, नियमात राहून त्या त्यातून बाहेर पडत आहेत. कबड्डीच नाही, तर अनेक खेळात इराणच्या महिला मैदानावर उतरताना दिसतात. कबड्डीत पूर्ण पेहराव करून खेळणे आता त्यांना चांगले अवगत झाले आहे. महत्वाचा फरक असा आहे की येथे महिलांचे सामने असले की तेथे सगळी कामे महिलाच करतात. प्रेक्षकही फक्त महिलाच असतात. स्पर्धा होतात तेव्हा पंचांपासून, फोटोग्राफी, वार्तांकन, प्रकाश योजना अशा आयोजनासाठी आवश्‍यक असणारी प्रत्येक कामे महिलाच करतात. महिलांना आपली क्षमता दाखवून देण्याचा भरपूर वाव येथे मिळतो.'' 

भारताविरुद्ध अंतिम सामना खेळताना एक भारतीय म्हणून दडपण होते हे मान्य करते. पण, मी येथे एक व्यावसायिक जबाबदारी घेऊन आले आहे हे मनावर बिंबवले होते. कुठल्याही परिस्थितीत भावनिक व्हायचे नाही हे स्वतःला बजावले. मीच जर डळमळीत झाले असते, तर आज या मुली सुवर्णपदक जिंकू शकल्या नसत्या. 
- शैलजा जैन, इराणच्या प्रशिक्षक


​ ​

संबंधित बातम्या