सेहवागनं Meme पोस्ट करत प्रिती झिंटाला केलं ट्रोल
मॅक्सवेलनं 49 चेंडूत तीन षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीनं 78 धावांची खेळी केली.
आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दहाव्या सामन्यात रॉयल चैलेंजर्स बंगळुरुने (RCB) कोलकाता नाइट राइडर्सला (KKR) 38 धावांच्या फरकानं हरवलं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात कर्णधार विराट कोहली आणि रजत पाटीदार स्वस्तात माघारी परतले. सामन्यावर केकेआर पकड मिळवणार असं वाटत होतं. मात्र, चौथ्या क्रमांकावर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) तुफानी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. मॅक्सवेलनं फक्त 28 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. देवदत्त पडिक्कल आणि एबी सोबत मॅक्सवेलनं अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. मॅक्सवेलनं 49 चेंडूत तीन षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीनं 78 धावांची खेळी केली. मॅक्सवेलच्या तुफानी फटकेबाजीनंतर विरेंद्र सेहवाग यानं मिम्स शेअर करत पंजाबच्या संघ मालकिनीला ट्रोल केलं. भारताचा माजी विस्फोटक खेळाडू विरेंद्र सेहवाग याचं ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
विरेंद्र सेहवाग यानं लूडो चित्रपटातील एक दृश्य पोस्ट केलं. त्यामध्ये मॅक्सवेलला खेळताना पाहून आधीच्या संघमालकाची प्रतिक्रिया असेही आहे. तसेच या मिम्ससोबत कॅप्शनमध्ये म्हटलेय की, ''आयपीएलमध्ये मॅक्सवेलला आपल्या क्षमतेनुसार खेळताना पाहून आनंद होतोय. '' 2020 आयपीएलमध्ये मॅक्सेवल पंजाबकडून खेळत होता. यावेळी त्याला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नव्हती. 13 सामन्यात मॅक्सवेलनं फक्त 108 धावा काढल्या होत्या. त्याला एकही षटकार लगावता आला नव्हता. त्यामुळे पंजाबने त्याला करारमुक्त केलं होतं. 2021 च्या हंगामपूर्वी झालेल्या लिलावात आरसीबीनं मॅक्सवेलला 14.25 कोटी रुपयांत विकत घेतलं होतं.
पाहा सेहवागचं मिम्स -
Good to see Maxwell finally play to his potential in this IPL.
Meanwhile Maxwell to his previous team owners.#RCBvKKR pic.twitter.com/StBnPIZrMg
— Virender Sehwag (@virendersehwag) April 18, 2021
रविवारी झालेल्या सामन्यात मॅक्सवेल आणि डिव्हिलिअर्सच्या फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीनं 20 षटकांत कोलकातांसमोर 205 धावांच आव्हान ठेवलं होंतं. कोलकाता संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 166 धावांपर्यंत मजल मारु शकला.