SRH ला मोठा धक्का; IPLदरम्यान कोचच्या छातीत दुखू लागले, करावी लागली अँजिओप्लास्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 April 2021

वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघानं सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले असून गुणतालिकेत तळाशी आहे

आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होऊन आठवडा उलटला आहे. यंदाच्या हंगामात सनरायजर्स हैदराबादची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे. वॉर्नरच्या नेतृत्वातील हैदराबाद संघानं सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले असून गुणतालिकेत तळाशी आहेत. अशा परिस्थितीत हैदराबाद संघाला आणखी एक धक्का बसला आहे. हैदराबाद संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या अचानक छाती दुखू लागल्यामुळे चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथील अपोलो रुग्णालयात मुरलीधरन याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून अँजियोप्लास्टी करण्यात आली. 
 
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, १८ एप्रिल 2021 रोजी सायंकाळी मुरलीधरनच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर उपचारासाठी त्याला चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे चाचणीत त्याच्या हृदयात एक ब्लॉक असल्याचे आढळले. हा ब्लॉक हटवण्यासाठी हृदयात स्टेंट टाकण्यात आला. मुरलीधरन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा हैदराबाद संघासोबत जोडला जाणार आहे.

मुरलीधरन २०१५ पासून सनराझर्स हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि मेंटर म्हणून काम पाहतोय. यंदाच्या हंगामात हैदराबादची कामगिरी खूपच खराब झाली आहे. सुरुवातीच्या तिन्ही लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादचा संग तळाशी असून बुधवारी त्यांची लढत पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे.
 
 मुरलीधरन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार ३४७ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. १३३ कसोटी, ३५० वनडे आणि १२ टी-२० सामन्यात मुरलीधरन यानं श्रीलंका संघाचं प्रतिनिधित्व केल आहे. यात त्यानं अनुक्रमे ८००, ५३४ आणि १३ विकेट घेतल्या आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या