परतीचा मार्ग स्वतःच बघावा; ऑस्ट्रेलिया पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची स्पष्टोक्ती

पीटीआय
Wednesday, 28 April 2021

आयपीएलमध्ये सहभागी झालेले ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आपल्या संघाच्या दौऱ्यातून भारतात गेलेले नाहीत. त्यांनी मायदेशी परतण्याची आपली व्यवस्था स्वतःच करावी, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्ट केले.

कॅनबेरा - आयपीएलमध्ये सहभागी झालेले ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आपल्या संघाच्या दौऱ्यातून भारतात गेलेले नाहीत. त्यांनी मायदेशी परतण्याची आपली व्यवस्था स्वतःच करावी, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्ट केले.

भारतात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारतातून येणारी विमानसेवा पूर्ण बंद केली आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटूंच्या माघारीचा प्रश्न निर्माण झाला आहे, पण त्यांना मायदेशात आणणे ही सरकारची जबाबदारी नसल्याचे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

ते खासगी दौऱ्यावर गेले आहेत. हा काही ऑस्ट्रेलिया संघाचा दौरा नव्हता. त्यांनी तिथे जाताना वैयक्तिक सुविधांचा वापर केला. परततानाही त्याचाच वापर करतील. ऑस्ट्रेलियात परतताना ते नक्कीच त्यांची वैयक्तिक व्यवस्था करतील, असे मॉरिसन यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाच्या १४ क्रिकेटपटूंचा आयपीएलमध्ये सहभाग आहे. त्यातील तिघांनी मायदेशी परतण्याचे ठरवले आहे. खेळाडूंबरोबरच मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकेल स्लेटर, लिसा स्थळेकर हे ऑस्ट्रेलियातील माजी खेळाडू समालोचक आहेत. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पंतप्रधान जॉन्सन यांच्या टिप्पणीवर मत व्यक्त करणे टाळले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया तसेच ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू संघटना सातत्याने खेळाडूंच्या संपर्कात आहेत. ही लीग जैवसुरक्षित वातावरणात होत आहे. भारतात असलेले खेळाडू तसेच ऑस्ट्रेलिया सरकारसह चर्चा करणार आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले.

आयपीएल २०२१मध्ये ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू
स्टीव्ह स्मिथ (दिल्ली कॅपिटल्स), डेव्हिड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद), पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स), ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) हे आयपीएलमध्ये भाग घेणाऱ्या १७ ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंपैकी आहेत. जोश हेजलवुड (चेन्नई सुपर किंग्ज), मिच मार्श (सनरायझर्स हैदराबाद) आणि जोश फिलिप (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) यांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आयपीएलमधून माघार घेतली.

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या करारातील १० टक्के रक्कम क्रिकेट ऑस्ट्रेलिया घेत असते. आता स्पर्धा संपल्यावर आयपीएलमधून मिळणाऱ्या रकतमेतून क्रिकेट ऑस्ट्रेलिया खेळाडूंसाठी चार्टर विमानाची व्यवस्था करणार का, धोका माहिती असूनही खेळण्यास आम्ही तयार झालो. लीग संपल्यावर आम्हाला तातडीने घरी न्यावे हीच अपेक्षा.
- ख्रिस लीन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू


​ ​

संबंधित बातम्या