आघाडीवर असलो तरी गाफील नाही : पाँटिंग

टीम ई-सकाळ
Saturday, 17 October 2020

पूर्ण ताकदीनिशी खेळताना यंदाच्या आयपीएलमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या दिल्लीचा आता प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत कस लागणार आहे.

शारजा : पूर्ण ताकदीनिशी खेळताना यंदाच्या आयपीएलमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या दिल्लीचा आता प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत कस लागणार आहे. ताकदवर असूनही हेलकावे खात असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईसमोर दिल्लीकरांची उद्या परीक्षा असेल.

IPL 2020 : स्पर्धेच्या मध्यांतरी नेतृत्व सोडणारे खेळाडू आठवतात का?

आठपैकी सहा सामने जिंकून दिल्लीचा संघ गुणतक्‍त्यात आघाडीवर आहे. त्यांची बाद फेरी जवळपास निश्‍चित मानली जात आहे त्यामुळे प्रशिक्षक रिकी पाँटिंग खेळाडू गाफिल राहणार नाही, याची काळजी घेत आहे. अजूनही सर्वोत्तम खेळ आमच्याकडून व्हायचा आहे, असे सांगून त्यांनी आपल्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहित केले आहे. 

भूतकाळाची आठवण
आमच्यासाठी आत्ता तरी सर्व काही व्यवस्थित दिसत असले, तरी ही आयपीएल आहे. येथे काहीही घडू शकते. मागच्या वेळेस आम्ही पहिले सहा सामने जिंकले होते, तरीही प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता, याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे येथून पुढेही प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे, असे पाँटिंग यांनी आजच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी सांगितले.

श्रेयसबाबत प्रश्‍नचिन्ह
दिल्ली संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. अमित मिश्रा आणि ईशांत शर्मा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेरच गेले आहेत. रिषभ पंत आणि हेटमायर दुखापतग्रस्त आहेत. त्यातच गेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कर्णधार श्रेयस अय्यरचा खांदा दुखावला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात तो खेळण्याची शक्‍यता कमी आहे. परिणामी ताकदवर असलेली दिल्लीची फलंदाजी काहीशी कमकुवत झाली आहे. 

गोलंदाजी ताकदवर
दिल्लीची गोलंदाजी मात्र यंदाच्या स्पर्धेतील सर्वात ताकदवर समजली जात आहे. कागिसो रबाडा आणि नॉर्किया यांच्यासमोर धावा करणे फारच कठीण आहे. त्यांच्या साथीला आता मुंबईचा तुषार देशपांडे आला आहे. फिरकीची मदार आर. अश्‍विन आणि अक्षर पटेल यांच्यावर आहे. त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांना धावा करणे सोपे जाणार नाही.

    -प्रतिस्पर्ध्यातील परतीची लढत, पहिल्या सामन्यात दिल्लीचा ४४ धावांनी विजय
    -प्रतिस्पर्ध्यातील गेल्या पाच चेन्नईचे चार विजय
    -क्रमवारीत सध्या दिल्ली अव्वल, चेन्नई सहावे

ठिकाण : शारजा क्रिकेट स्टेडियम
हवामानाचा अंदाज : लढतीच्यावेळी अपेक्षित तापमान २९ अंश. आर्द्रता ४७ टक्के राहणार असल्याने उकाड्याचा त्रास कमी होणार
खेळपट्टीचा अंदाज : शारजातील सरासरी धावा आता कमी. सीमारेषा जवळ, पण त्याच्या आहारी जाणे धोकादायक. 

लक्ष्यवेधक
    - फलंदाजी तसेच गोलंदाजीत अद्यापही चेन्नईला सूर गवसलेला नाही
   - रिषभ पंत, श्रेयस अय्यर आणि हेतमेयरच्या अनुपस्थितीमुळे अजिंक्‍य रहाणे तसेच ॲलेक्‍सी कॉरी यांना अतिरिक्त संधी अपेक्षित.


​ ​

संबंधित बातम्या