IPL 2021: सेंच्युरी करुन कोहलीला इम्प्रेंस करणाऱ्या गड्याला मिळाली पदार्पणाची संधी

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 9 April 2021

आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये  (RCB XI) ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमीसन आणि डेनियल क्रिश्चियन यांनाही संधी देण्यात आली.

IPL 2021: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सलामीच्या सामन्याने आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात झालीये. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  टॉस जिंकल्यावर विराट कोहलीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखी होती. कारण इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत विराटला नाणेफेकीमध्ये अपयशावर अपयश आल्याचे पाहायला मिळाले. नाणेफेक जिंकल्यानंतर विराटने प्लेइंग इलेव्हनमध्ये आरसीबीकडून रजत पाटीदार (Rajat Patidar) आयपीएलमध्ये डेब्यू करत असल्याचे स्पष्ट केले.  

आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये  (RCB XI) ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमीसन आणि डेनियल क्रिश्चियन यांनाही संधी देण्यात आली. मुंबई इंडियन्सकडून  क्रिस लीनने पदार्पण केले.  डाव्या हाताने गोलंदाजी करणारा दक्षिण आफ्रिकेचा  मार्को जेनसन देखील या सामन्यातून आयपीएल डेब्यू करत आहे. आतापर्यंत दोन्ही संघात 27 सामने झाले आहेत. यातील 17 सामन्यात मुंबई इंडियन्सन्सने विजय मिळवला असून 10 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला यश मिळाले आहे.  

धोनीच आयपीएलचा 'बाहुबली'; सामने जिंकण्यात चेन्नई मुंबईपेक्षा वरचढ

कोण आहे रजत पाटीदार (Rajat Patidar)

रजत पाटीदार (Rajat Patidar) ला आरसीबीने 20 लाख या मूळ किंमतीत खरेदी केले होते. एक सर्वोत्तम फलंदाज आणि फिल्डर असलेल्या पाटीदारने देशांतर्गत सामन्यात लक्षवेधी कामगिरी केलीये.  पाटीदारने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच आयपीएलच्या मिनी लिलावात आरसीबीने त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते.  पाटीदार मध्य प्रदेशकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळतो.  36 फर्स्ट क्लास सामन्यात त्याने 2253 धावा केल्या असून यात  6 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.  

लिस्ट ए क्रिकेटमध्ये पाटीदारने 37  सामन्यात 1246 धावा केल्यात. यात  3 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.   टी-20 मध्ये रजत पाटीदारने Rajat Patidar  22 सामन्यात  699 धावा केल्या आहेत.  सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत रजतने गोवा विरुद्धच्या सामन्यात  51 चेंडूत  96 धावांची खेळी केली होती. यात त्याने 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.  

आरसीबीच्या सराव सामन्यात केलं होत शतक  

आयपीएल 2021 साठी RCB च्या ताफ्यात सामील होताच त्याने लक्ष वेधले होते. रजत पाटीदारने 49 चेंडूत 104 धावा केल्या होत्या.  या कामगिरीने त्याने विराट कोहलीला इम्प्रेस केले होते. देवदत्त पदिक्कल कोरोनामुळे काही सामन्याला मुकणार असल्यामुळे त्याच्या जाग्यावर रजतला संधी मिळाली असून तो या संधीचा कितपत फायदा उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  


​ ​

संबंधित बातम्या