प्रमुख परदेशी खेळाडूंविना आयपीएल?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 May 2021

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तीन आठवड्यांत आयपीएल पूर्ण करण्याचा विचार बीसीसीआय जवळपास निश्चित करत असले, तरी परदेशी खेळाडूंची उपस्थिती कळीचा मुद्दा ठरणार आहे.

वर्ल्डकपच्या तयारीसाठी इतर देशांच्या मालिका अगोदरच निश्चित
नवी दिल्ली - सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तीन आठवड्यांत आयपीएल पूर्ण करण्याचा विचार बीसीसीआय जवळपास निश्चित करत असले, तरी परदेशी खेळाडूंची उपस्थिती कळीचा मुद्दा ठरणार आहे. आयपीएलशी करारबद्ध असलेले बहुतांशी परदेशी खेळाडू त्यांच्या त्यांच्या राष्ट्रीय संघातून खेळण्यास कटिबद्ध असल्यामुळे या खेळाडूंशिवाय आयपीएल बीसीसीआयला उरकावी लागण्याची शक्यता आहे.

१८/१९ सप्टेंबर ते ९ किंवा १० ऑक्टोबर असा कालावधी बीसीआयने तयार केला आहे आणि ही स्पर्धा अमिरातीत होईल हेसुद्धा तेवढेच निश्चित वाटत आहे, पण या कालावधीसाठी भारतीय खेळाडू उपलब्ध असले तरी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज (कॅरेबियन प्रीमियर लीग) यांच्या खेळाडूंबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात प्रस्तावित असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी इतर देशांनी सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान मालिका अगोदरच आयोजित केलेल्या आहेत, त्यामुळे बीसीसीआयची अडचण होण्याची शक्यता आहे.
इंग्लंडमध्ये होणारी हंड्रेड ही स्पर्धा संपल्यानंतर इंग्लंडचा संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार, त्यामुळे ऑईन मॉर्गन, जॉस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअस्टॉ, करन बंधू आदी  खेळाडू आयपीएलपासून दूर राहतील असे इंग्लंड मंडळाने अगोदरच जाहीर केले आहे. भारताविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर इंग्लंडचा संघ लगेचच बांगलादेश दौऱ्यावर जात आहे.

न्यूझीलंडचा संघ सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान मर्यादित षटकांची मालिका पाकिस्तानविरुद्ध अमिरातीत खेळणार आहे. त्याच वेळी आयपीएलही अमिरातीत होणार आहे. दोघांचा कार्यक्रम एकच असल्यास न्यूझीलंडचे खेळाडूही आयपीएला मुकण्याची शक्यता आहे.


​ ​

संबंधित बातम्या