आयपीएललाही कोरोनाने घेरले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 May 2021

कोरोनाचा उद्रेक देशात सुरू असताना जैवसुरक्षा वातावरणात खेळवण्यात येत असलेली आयपीएलही आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे कोलकाता आणि बंगळूर यांच्यात सोमवारी होणारा सामना लांबणीवर टाकण्यात आला.

कोलकाता-बंगळूर सामना लांबणीवर; स्पर्धेचेच भवितव्य अधांतरी
अहमदाबाद - कोरोनाचा उद्रेक देशात सुरू असताना जैवसुरक्षा वातावरणात खेळवण्यात येत असलेली आयपीएलही आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे कोलकाता आणि बंगळूर यांच्यात सोमवारी होणारा सामना लांबणीवर टाकण्यात आला. उद्याचा सामना होणार की नाही याबाबत बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले नाही, पण दिल्लीत असलेल्या चेन्नई संघापर्यंत कोरोनाचे लोण पोहचले असल्यामुळे एकूणच आयपीएलचे भवितव्य धोक्यात आले आहे.

कोलकाता संघाचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती जो बहुतेक सर्व सामन्यांत खेळलेला आहे, त्याच्यासह राखीव खेळाडू असलेला संदीप वॉरियर यांच्या गेल्या चार दिवसांतील तीन चाचण्या पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर होताच आयपीएलमध्ये एकच खळबळ उडाली. कोलकाता संघातील इतर खेळाडूंच्या चाचण्या निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले असले, तरी सोमवारचा सामना पुढे ढकलण्याशिवाय बीसीसीआयकडे पर्याय राहिला नाही. हा सामना कधी होणार हे मात्र त्यांनी कळवले नाही. यावरून आयपीएलचे वेळापत्रक बिघडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोलकाताचा अखेरचा सामना २९ एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल संघाविरुद्ध झाला होता. रिषभ पंतचा हाच दिल्लीचा संघ रविवारी पंजाबविरुद्ध खेळला आहे. वरुण चक्रवर्ती २९ एप्रिल रोजीचा सामना खेळलेला असल्यामुळे त्याचा संसर्ग दिल्ली खेळाडू आणि त्यांच्याकडून पंजाब संघातील खेळाडूंपर्यंत पोहचला नसल्याची खात्री करण्यात येत आहे. दिल्लीतील सर्व खेळाडूंची वारंवार चाचणी करण्यात आली, त्यात कोणीही बाधित असल्याचे निदान झाले नाही, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. तरीही संपूर्ण आयपीएलच संकटात सापडली आहे.

चेन्नई संघातील संसर्गाचे लोण
एकीकडे अहमदाबाद येथे सामने खेळत असलेल्या कोलकाता संघात कोरोनाचा शिरकाव झालेला असताना नवी दिल्लीत सामने असलेल्या चेन्नई संघालाही कोरोना संसर्गाचा विळखा बसला आहे. धोनीच्या या संघाचे सीईओ काशी विश्वनाथ, गोलंदाजीचे प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि तांत्रिक संघातील एक सदस्य असे तिघे जण बाधित झाले आहेत. सुरुवातीला त्यांच्या खोट्या रिपोर्टवरून गोंधळ उडाला होता. या तिघांची अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आली होती; मात्र आरटी-पीसीआर चाचणीत या तिघांना बाधा झाल्याचे निदान झाले. या तिघांना सौम्य लक्षणे असल्याचे सांगण्यात आले आहे; मात्र त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आला आहे त्या सर्वांना सावध राहावे लागणार आहे.

दिल्लीतील कोटला स्टेडियममध्येही लोण
नवी दिल्लीतील कोटला स्टेडियमवर मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे, परंतु मैदानावरील काही ग्राऊंडमनना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले, परंतु बाधित झालेले हे ग्राऊंडसमन ड्युटीवर नव्हते, असा खुलासा दिल्ली क्रिकेट संघटनेचे प्रमुख रोहन जेटली यांनी केला आहे.


​ ​

संबंधित बातम्या