‘सीमोल्लंघना‘च्या आयपीएलची दसऱ्याला सांगता?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 June 2021

भारताच्या सीमा ओलांडून अमिरातीत उलटलेला फड रंगणाऱ्या आयपीएलचा कार्यक्रम आता जवळपास निश्चित होत आहे. १५ सप्टेंबरचा मुहूर्त असून १५ ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे, त्याच दिवशी सर्वत्र दसरा साजरा केला जाणार आहे.

नवा दिल्ली - भारताच्या सीमा ओलांडून अमिरातीत उलटलेला फड रंगणाऱ्या आयपीएलचा कार्यक्रम आता जवळपास निश्चित होत आहे. १५ सप्टेंबरचा मुहूर्त असून १५ ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे, त्याच दिवशी सर्वत्र दसरा साजरा केला जाणार आहे. 

आयपीएल अमिरातीत घेण्यावरून बीसीसीआय आणि अमिराती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बैठक झाली. गतवेळेप्रमाणे दुबई, अबुधाबी आणि शारजा येथे सामने होतील, यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगला संवाद झाला. अमिराती मंडळाने तोंडी हिरवा कंदील दिलेला आहे. आता आम्ही कार्यक्रम निश्चित करत आहोत. त्यानुसार १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत उरलेले ३१ सामने खेळवले जातील , असे बीसीसीआयच्या सूत्रांनी कळवले आहे.

परदेशी खेळाडूंच्या सहभागाविषयी विचारले असता बीसीसीआयचा पदाधिकारी म्हणाला, संबंधितांशी आमची चर्चा तर सुरू झालेली आहे. बहुतांशी परदेशी खेळाडू उपलब्ध असतील, जे काही खेळाडू येणार नाही त्यानंतर कशी कार्यवाही करायची हे आम्ही निश्चित करून, पण ही उर्वरित आयपीएलही चांगलीच रंगतदार होईल, अशी आम्हाला खात्री आहे.

बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण बैठक झाल्यानंतर आम्ही परदेशी क्रिकेट मंडळांबरोबर चर्चा करून त्यांचे खेळाडू कसे उपलब्ध होतील, याची माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे. यातून चांगले तेच घडेल, अजूनपर्यंत तरी इतर मंडळांकडून उत्तर आलेले नाही, असेही या पदाधिकाऱ्याने  सांगितले.

काही देशांच्या अगोदरच इतर देशांशी आंतरराष्ट्रीय मालिका ठरलेल्या असल्यामुळे काही परदेशी खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध नसतील, परंतु पर्यायी खेळाडू निवडण्याचाही पर्याय तपासला जात आहे, असे असल्याचे सांगण्यात येत आहे.

उष्णतेमुळे कार्यक्रमात बदल
१९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर असा अगोदरचा प्राथमिक कार्यक्रम तयार करण्यात येत होता, त्यात १० दिवशी प्रत्येकी दोन सामने होणार होते; परंतु अमिरातीत याच महिन्यात फार उष्णता असते. त्यामुळे दुपारचे सामने खेळताना खेळाडूंना त्रास होऊ शकतो याचा विचार करून पाच दिवस स्पर्धा लांबवण्यात येणार आहे. त्यामुळे ‘१० डबल हेडर' मधील चार ते पाच सामने कमी होतील, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.


​ ​

संबंधित बातम्या