आयपीएलचे ठरतेय! १८/१९ सप्टेंबरला अमिरातीत मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 May 2021

इग्लंड क्रिकेट मंडळाकडे त्यांच्याविरुद्धची मालिका अगोदर सुरू करण्याची विनंती करण्यापेक्षा उर्वरित आयपीएल पूर्ण करण्याचा मार्ग आपणच शोधला पाहिजे आणि तयार केला पाहिजे, असा विचार करून बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे.

नवी दिल्ली - इग्लंड क्रिकेट मंडळाकडे त्यांच्याविरुद्धची मालिका अगोदर सुरू करण्याची विनंती करण्यापेक्षा उर्वरित आयपीएल पूर्ण करण्याचा मार्ग आपणच शोधला पाहिजे आणि तयार केला पाहिजे, असा विचार करून बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार १८ किंवा १९ सप्टेंबरपासून आयपीएल अमिरातीत सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

सर्व शक्यतांचा विचार करून आणि तारखांची जुळवाजुळव करून बीसीसीआय अंतिम आराखड्याजवळ पोहचले आहेत. तीन आठवड्यांची स्पर्धा १० दिवस प्रत्येकी दोन सामने अशी ढोबळ मानाने रचना असेल. अंतिम सामना ९ किंवा १० ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.

स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचे अंतिम सामन्यासह ३१ सामने शिल्लक आहेत. १० दिवस प्रत्येकी दोन सामने आयोजित केल्यास तीन आठवड्यांत ही स्पर्धा पूर्ण होईल त्यामुळे संघ मालक, ब्रॉडकास्ट तसेच बीसीसीआयचेही नुकसान होणार नाही.

हा नवा प्रस्तावित कार्यक्रमाबाबत बीसीसीआयने सर्व फ्रँचाईसशी चर्चाही सुरू केली आहे. १८ सप्टेंबरला शनिवार आणि १९ तारखेला रविवार असून आयपीएल सुरू करण्यास हे सुट्टीचे दिवस उपयुक्त असतील. त्याचप्रमाणे ९ आणि १० ऑक्टोबर अनुक्रमे शनिवार, रविवार अंतिम सामन्यासाठी योग्य ठरतील, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

असा असेल कार्यक्रम

  • तीन आठवड्यांची स्पर्धा
  • १० दिवस प्रत्येकी दोन सामने
  • कसोटी खेळाडू लंडनहून थेट दुबईत
  • इंग्लंडचे खेळाडूही भारतीय संघासोबत येणार

लंडन ते दुबई
भारताचा इंग्लंड दौऱ्यातील अखेरचा कसोटी सामना १४ सप्टेंबर रोजी संपत आहे. दुसऱ्या दिवशी सर्व खेळाडू दुबईसाठी चार्टर्ड विमानाने रवाना होतील एका जैवसुरक्षा वातावरणातून सुरक्षित असलेल्या विमानाने दुसऱ्या जैवसुरक्षा वातावरणात (अमिराती) प्रवेश करणार असल्यामुळे विलगीकरणाचा प्रश्न येणार नाही. त्यामुळे १५-१६ सप्टेंबरला दुबईत दाखल झाल्यावर टीम इंडियातील सर्व खेळाडू १८-१९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी उपलब्ध असतील, असे सांगण्यात येत आहे. याच विमानाने इंग्लंडचेही खेळाडू आयपीएलसाठी येतील. वेस्ट इंडीजमध्ये त्यांची कॅरेबियन लीग वेळेत संपत असून ते अमिरातीत येऊन तीन दिवसांचे विलगीकरण करतील आणि तेसुद्धा आयपीएलसाठी उपलब्ध असतील.

सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी मालिका खेळणार होता. ही मालिका बीसीसीआय रद्द करण्याचा विचार करत आहे. 


​ ​

संबंधित बातम्या