पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्याने सर्व सुरळीत होण्याची आशा

पीटीआय
Friday, 23 April 2021

घसरत असलेली फलंदाजी पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीद्वारे रुळावर येईल, अशी अपेक्षा मुंबई इंडियन्स बाळगत आहे. पंजाबला आपली स्पर्धेतील घसरण रोखायची आहे; तर कामगिरीत सातत्य आणण्यासाठी मुंबई उत्सुक आहे.

चेन्नई - घसरत असलेली फलंदाजी पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीद्वारे रुळावर येईल, अशी अपेक्षा मुंबई इंडियन्स बाळगत आहे. पंजाबला आपली स्पर्धेतील घसरण रोखायची आहे; तर कामगिरीत सातत्य आणण्यासाठी मुंबई उत्सुक आहे.

निष्प्रभ फलंदाजीचा फटका मुंबईला दिल्लीविरुद्धच्या सामन्यात बसला होता. कर्णधार रोहित शर्माने चांगली खेळी केली होती, पण त्याला सहकाऱ्यांची साथ लाभली नव्हती. फलंदाजीबरोबर गोलंदाजीचा प्रश्नही डोके वर काढत आहे. संघ प्रतिकूल परिस्थिती असताना बाजू सावरण्यात गोलंदाज मुंबईच्या मदतीस आले आहेत, पण दिल्लीविरुद्ध गोलंदाजांनीही निराशाच केली.

गतमोसमातील मुंबईच्या विजेतेपदात मोलाची कामगिरी केलेले सूर्यकुमार यादव तसेच इशान किशन यांना अद्याप सूर गवसलेला नाही. त्यातच किएरॉन पोलार्ड तसेच हार्दिक आणि कृणाल हे पंड्या बंधू अपयशी ठरल्याने मुंबईची डोकेदुखी वाढली आहे. स्पर्धा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असली तरी सर्व काही सुरळीत घडण्यासाठी योग्य वेळी सूर गवसणे आणि कामगिरीत सातत्य महत्त्वाचे आहे. स्पर्धेत निष्प्रभ ठरलेल्या पंजाबविरुद्धच्या लढतीद्वारे याची सुरुवात होईल, अशी मुंबई संघव्यवस्थापनास अपेक्षा आहे.

स्पर्धेतील विजयी सुरुवातीनंतर पंजाबची गाडी घसरली. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध त्यांचा डाव १२० धावांत संपला. त्यातून संघासमोरील प्रश्न अनेक आहेत हे लक्षात आले. भक्कम फलंदाजी ही त्यांची जमेची बाब असेल असे मानले जात होते, पण कागदावरील ताकद मैदानात दिसलेली नाही. राहुल आणि मयांक अगरवाल जोरदार सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले आहेत. युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याचा प्रभाव पडलेला नाही. निकोलस पूरणनेही लौकिकास साजेशी कामगिरी केलेली नाही.

सलग तीन पराभवांनी पंजाबचे मनोधैर्य खचलेले आहे. कर्णधार राहुलने दोन अर्धशतके केली आहेत, पण त्याला सहकाऱ्यांची साथ लाभलेली नाही. सहकाऱ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यात तो कमी पडला आहे. संघनिवड योग्य होत नसल्याने प्रश्न वाढतच आहेत. दीपक हुडाकडून सातत्यपूर्ण कामगिरी अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज झाये रिचर्डसन आणि रिली मेरेडिथ महागडे ठरले आहेत. आता मुरुगन अश्वीनऐवजी रवी बिश्नोईची निवड करून पंजाब गोलंदाजी भक्कम करण्याचा प्रयत्न करणार आहे.

आजचा सामना
मुंबई वि. पंजाब प्रतिस्पर्ध्यांत २६ लढती
१४ विजय १२
२२३ सर्वोत्तम २३०
८७ नीचांक ११९
हवामानाचा अंदाज - लढतीच्या वेळी अपेक्षित तपमान ३१ अंश. आकाश ढगाळलेले, पण पावसाची शक्यता नाही.

  • ठिकाण - एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
  • थेट प्रक्षेपण - संध्याकाळी ७.३० पासून स्टार स्पोर्टस्
  • सध्याचे स्थान - मुंबई चौथ्या क्रमांकावर; तर पंजाब तळाच्या आठव्या
  • यंदाच्या स्पर्धेत मुबईचे चार पैकी दोन सामन्यांत विजय; तर पंजाबचा चारपैकी एका लढतीत
  • खेळपट्टीचा अंदाज - फलंदाजांचा कस पाहणारी खेळपट्टी. फिरकी गोलंदाज प्रभावी ठरण्याची शक्यता. प्रथम फलंदाजी फायदेशीर. धावांचा पाठलाग केलेला संघ आठपैकी पाच सामन्यांत पराजित. पहिल्या डावातील सरासरी धावा १५७
  • गेल्या पाच सामन्यांत मुंबईचे तीन विजय
  • पंजाबचा दोनपैकी एक विजय दुसऱ्या एलिमिनेटर षटकात
  • मुंबईचे सहा विजय प्रथम फलंदाजी करताना; तर उर्वरित आठ धावांचा पाठलाग करताना
  • पंजाबचे १२ पैकी सात विजय प्रथम फलंदाजी करताना

​ ​

संबंधित बातम्या