आयपीएलमुळे अमिरातीतील खेळपट्ट्यांवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 July 2021

आयपीएलचे उर्वरित सामने अमिरातीत होणार आहेत, त्याचा खेळपट्ट्यांवर निश्चितच परिणाम होईल, त्यामुळे तेथेच होत असलेल्या विश्वकरंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेत फिरकी गोलंदाजांचाच अधिक बोलबाला राहील, अशी भीती दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - आयपीएलचे उर्वरित सामने अमिरातीत होणार आहेत, त्याचा खेळपट्ट्यांवर निश्चितच परिणाम होईल, त्यामुळे तेथेच होत असलेल्या विश्वकरंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेत फिरकी गोलंदाजांचाच अधिक बोलबाला राहील, अशी भीती दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी व्यक्त केली आहे.

भारतातली कोरोनाच्या भयंकर स्थितीमुळे आयपीएल स्थगित करावी लागली होती. आता उरलेले ३१ सामने अमिरातीत खेळवले जाणार आहेत आणि त्यानंतर काही दिवसांतच तेथे ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर असा आयपीएलचा कालावधी आहे, तर विश्वकरडक स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

आयपीएलचे सामने खेळल्यानंतर खेळपट्ट्या कोरड्या होतील, दक्षिण आफ्रिका तसेच इतर देशांप्रमाणे त्या खेळपट्ट्या नसतील जेथे १८० ते २०० धावा फटकावल्या जात असतात. त्यामुळे अमिरातीत सावधपणे फलंदाजी करावी लागेल, असे बाऊचर यांनी म्हटले आहे. 

साधारणतः उपखंडात जशी परिस्थिती असते त्यापेक्षाही एक पाऊल पुढे असणारी खेळपट्ट्यांची स्थिती ट्वेन्टी-२० विश्वकरंडकाच्या वेळी असू शकेल. दुबई, शारजा किंवा अबुधाबी येथे अधिक मैदाने नाही, त्यामुळे या प्रमुख स्टेडियमवर आयपीएलचे सामने होतील आणि त्यामुळे खेळपट्ट्यांमधील जिवंतपणा अधिकच कमी झालेला असेल, परिणामी अशा खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे अवघड असेल आणि सामन्याची सूत्रे फिरकी गोलंदाजांच्या हाती असतील, असा अंदाज बाऊचर यांनी व्यक्त केला.

आयपीएलचे सामने पाहिल्यानंतर कोणती धावसंख्या निर्णायक ठरू शकते याचा अंदाज बाधता येईल आणि त्यानुसारच विश्वकरंडक स्पर्धेची रणनिती तयार करावी लागेल. काहीही असले तरी फिरकी गोलंदाजांची भूमिका निर्णायक असणार आहे, असे बाऊचर म्हणाले.

आफ्रिकेचे प्रशिक्षक आत्तापासूनच ज्या प्रकारे भीती व्यक्त करू लागले आहेत, त्यानुसार त्यांची मदार डावखुरा फिरकी गोलंदाज ताब्रिझ शमसीवर असणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध ३-२ अशी जिंकलेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत शमसीने सात विकेट मिळवल्या.


​ ​

संबंधित बातम्या