IPL 2021 : सुर्यानं कमिन्सला लावलेला षटकार पाहून हार्दिक पांड्याही झाला आवाक

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 13 April 2021

यंदाच्या हंगामातील त्याने पहिले अर्धशतक कोलकाता विरुद्ध झळकावले आहे. 

IPL 2021 Kolkata vs Mumbai, 5th Match :  मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्यात सुर्यकुमार यादवने दमदार खेळी केली. सलामीवीर क्विंटन डिकॉक स्वस्तात माघारी फिरल्यानंतर सुर्यकुमारने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. त्याने 36 चेंडूत 56 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय सामन्यात षटकाराने खाते उघडणाऱ्या सुर्याने षटकाराने अर्धशतक पूर्ण केले. सुर्यकुमार यादवने पॅट कमिन्सला मारलेला षटकार जबरदस्त असा होता.  

 

मुंबई इंडियन्सच्या डावातील 10 व्या षटकातील 5 व्या चेंडूवर पॅट कमिन्सने ऑफ साईडला सरकत मनगटातील ताकदीच्या जोरावर उत्तुंग षटकार मारला. त्याने फटकावलेला चेंडू हा 99 मीटर इतका लांब अंतरावर जाऊन पडला. त्याचा हा शॉट पाहून ड्रेसिंग रुममध्ये असलेला हार्दिक पांड्याही आवाक झाल्याचे पाहायला मिळाले. सुर्यकुमारने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार खेचले.  अर्धशतकानंतर 11 व्या षटकात शाकिबने त्याला बाद केले. गिलने त्याचा सोपा झेल टिपला. बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात सुर्याने 23 चेंडूत 31 धावांची खेळी केली होती. यंदाच्या हंगामातील त्याने पहिले अर्धशतक कोलकाता विरुद्ध झळकावले आहे. 

 (हेही वाचा ; यूनिवर्स बॉसचा षटकारांचा विक्रम; रोहित-धोनी आसपासही नाहीत)

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने सलामीच्या सामन्यात बंगळुरुविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. मुंबई इंडियन्स स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या शोधात असून कोलकाता नाईट रायडर्स सलग दुसरा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहे.   


​ ​

संबंधित बातम्या