गेल नावाच्या वादळाला परागनं रोखलं; स्टोक्सनं घेतला अप्रतिम कॅच (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 12 April 2021

राजस्थानसाठी डोकेदुखी ठरेल, अशी फटकेबाजी करणाऱ्या ख्रिस गेल रियान परागच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

IPL 2021, Rajasthan vs PBKS, 4th Match : मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल या जोडीने सालाबादप्रमाणे पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात केली. मयंक चांगली फटकेबाजी करत असताना पदार्पण करणाऱ्या चेतन साकारियाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. मयंक माघारी फिरल्यानंतर स्फोटक गेल मैदानात आला. त्याने आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश करत राजस्थानच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. लोकेश राहुलच्यासोबत अर्धशतकी भागीदारी करत त्याने पंजाबला सुस्थितीत आणले. 

IPL 2021 : ट्रक ड्रायव्हरच्या पोराची धमाकेदार एन्ट्री

राजस्थानसाठी डोकेदुखी ठरेल, अशी फटकेबाजी करणाऱ्या ख्रिस गेल रियान परागच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. बेन स्टोक्सने सीमारेषेवर त्याचा उत्कृष्ट झेल टिपला. गेलने 28 चेंडूत 4 चौकार आणि 2 उत्तुंग षटकाराच्या मदतीने 40 धावांची उपयुक्त खेली केली. तो अर्धशतक पूर्ण करुन पंजाबच्या संघाला आणखी मजबूत स्थितीत घेऊन जाईल, असे वाटत होते. पण गेलच्या वादळी खेळीला ब्रेक लावत परागने संघाला आवश्यक ती विकेट मिळवून दिली. गेल आणि लोकेश राहुलने दुसऱ्या विकेटसाठी 67 धाावांची भागीदारी केली.  

 

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या डावातील आठव्या आव्हरमध्ये बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर ख्रिस गेलने पहिला षटकार खेचला. या षटकारासह त्याने आयपीएलच्या इतिहासात 350 षटकारांचा टप्पा पार केला. त्याच्या खात्यात आता 351 षटकारांची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये गेलने 133 सामन्यातील  132 डावात 388 चौकार खेचले आहेत. 175 ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च खेळी आहे.


​ ​

संबंधित बातम्या