अष्टपैलू खेळाडू राजस्थान रॉयल्सला तारणार

सुनंदन लेले
Sunday, 4 April 2021

पहिल्या आयपीएल स्पर्धेवर जोरदार ठसा उमटवून विजेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघात बरेच बदल झाले आहेत. 

पहिल्या आयपीएल स्पर्धेवर जोरदार ठसा उमटवून विजेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघात बरेच बदल झाले आहेत. नवीन कप्तान संजू सॅमसन आपल्या संघाला कसा विजयाचा मार्ग दाखवतो, हे बघणे मजेचे ठरणार आहे. त्याच्या राजस्थान रॉयल्स संघाचा घेतलेला हा आढावा...
राजस्थान रॉयल्स संघाचे सर्वांत मोठे बलस्थान ना फलंदाजी आहे, ना गोलंदाजी. त्यांची ताकद दडली आहे संघातील जातीवंत अष्टपैलू खेळाडूंच्यात. बेन स्टोक्स, शिवम दुबे, राहुल तिवातिया आणि ख्रिस मॉरिस एकाच संघातून खेळणार असल्याने राजस्थान संघाकडे दर्जेदार अष्टपैलू खेळाडूंची जणू माळच आहे. चारही खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीत तितकेच वाक्‌बगार आहेत. या चौघांनी योग्य वेळी थोडे थोडे योगदान दिले, तरी राजस्थान रॉयल्स संघ यशाचा मार्ग सहज शोधू शकतो.

कमजोरी : जोफ्रा आर्चरला दुखापत झालेली असल्याने नव्या चेंडूवर कोण अचूक मारा करून समोरच्या संघावरचे दडपण वाढवणार, ही समस्या राजस्थान रॉयल्स संघाची मोठी कमजोरी ठरणार आहे. ख्रिस मॉरिसला कोट्यवधी रुपये देऊन संघात दाखल करून घेतले असले, तरी त्याच्या वाढत्या वयाचा परिणाम गोलंदाजीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आयपीएल 2021 संदर्भातील घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा

संधी : संजू सॅमसन दर्जेदार फलंदाज आहे, यात शंका नाही. कारण त्याने राजस्थान संघाकरिता नेहमीच उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यानेच संघ व्यवस्थापनाला संजू सॅमसनला कप्तानीची जबाबदारी देण्याचा मोह पडला. आता ही जबाबदारी संजू सॅमसन कसे पेलतो, हे बघावे लागेल. संजू सॅमसनला आपले गुण दाखविण्याची मोठी संधी मिळणार आहे. यशस्वी जैसवालबद्दल खूप चांगले बोलले जाते. गेल्या वर्षी त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती. संघाने विश्वास दाखविल्यास आपली आक्रमक फलंदाजी सादर करायची संधी यशस्वी जैसवालला असेल.

धोका : बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर असे इंग्लंडचे तीन दर्जेदार खेळाडू एकाच संघात खेळण्याचा म्हणावा तसा फायदा राजस्थान संघाला अजूनपर्यंत झालेला दिसत नाही. हे तीन खेळाडू सर्वोत्तम प्रकारांत मोडत असले, तरी त्यांनी प्रत्येक सामन्यात जीव ओतून खेळणे अपेक्षित आहे आणि तसे होत नसल्याचा धोका राजस्थान संघाला भेडसावत आहे. जमते त्या दिवशी बेन स्टोक्स एकहाती सामना जिंकून देतो, हे सत्य असले तरी स्टोक्स नेहमी सामन्यात १०० टक्के प्रयत्न करतो, असे भासत नाही. हा धोका संजू सॅमसनला कप्तान म्हणून सतावणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या