IPL 2021 : राजस्थान, पंजाबचा आज धडाका; कोण मारणार बाजी?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 April 2021

IPL 2021 : के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज आणि संजू सॅमसन कर्णधार असलेला राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीत चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे.

IPL 2021 : मुंबई - के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज आणि संजू सॅमसन कर्णधार असलेला राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीत चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे. वानखेडे स्टेडियमवरील या लढतीत प्रतिस्पर्धी संघांचे लक्ष्य आयपीएलला विजयी सुरुवात करण्याचेच असेल.

बेन स्टोक्स, जोस बटलर यांनीही सॅमसनप्रमाणे धावांचा पाऊस पाडावा, अशी राजस्थानची अपेक्षा असेल. बटलर हा यशस्वी जैसवालच्या साथीत जोरदार सुरुवात करून देईल. हा धावांचा वेग सॅमसन आणि स्टोक्स वाढवत नेतील, असे राजस्थानचे गणित आहे. शिवम दुबे, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, रियान पराग, लियाम लिविंगस्टोन हे पंजाबची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. गोपाल, तेवतिया आणि पराग हे तिघेही लेगस्पीन गोलंदाज आहेत. त्यापैकी कोणाला राजस्थान पसंती देणार, हेही लक्षवेधक ठरेल. दुबे आणि तेवतिया हे स्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे. जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत अष्टपैलू ख्रिस मॉरिसकडून जास्त अपेक्षा असतील. चारच परदेशी खेळाडूंचा समावेश होणार असल्याने मुस्तफिझूर रहमान याला संघात स्थान कसे देणार, हा प्रश्न आहे. 

हेही वाचा : पृथ्वीच्या तुफानी फटकेबाजीवर प्रेयसी फिदा

गतमोसमात ६७० धावा केलेला राहुल आणि ४२४ धावा केलेला मयांक अगरवाल यांच्या साथीला ख्रिस गेलही  आहे. सध्या बहरात असलेला डेव्हिड मलान, एम. शाहरुख खान, निकोलस पूरण हे आक्रमकही आहेत. शाहरुखला दीपक हुडा आणि सर्फराज खान यांच्याऐवजी पसंती मिळण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमी, झाये रिचर्डसन आणि रिली मेरेडिथ, खिस जॉर्डन हे राजस्थानला कसे रोखतात यावरही खूप काही अवलंबून असेल. मुरुगन अश्विन आणि रवी बिश्नोई या फिरकी गोलंदाजांवर धावा रोखण्याचीही जबाबदारी असेल.

हेही वाचा : IPL 2021: भज्जीला फक्त एकच षटक का दिलं? मोर्गननं सांगितलं कारण

लक्षवेधक

 •  गेल्या पाच लढतींत पंजाबचे तीन विजय, तर राजस्थानचे दोन
 •  गेल्या स्पर्धेतील दोनही सामन्यांत राजस्थानची सरशी
 •  प्रथम फलंदाजी असताना प्रतिस्पर्ध्यांचा प्रत्येकी सहा सामन्यांत विजय
 •  धावांचा पाठलाग करतानाही राजस्थान ६ सामन्यांत विजयी, तर पंजाब तीन 
 •  सॅमसनच्या पंजाबविरुद्ध १३४.७४ च्या स्ट्राइक रेटने ५१२ धावा
 •  राहुलला राजस्थानविरुद्धच्या चारशे धावा पूर्ण करण्याची संधी
 •  राहुल सेहवागच्या सर्वाधिक १०६ षटकारांपासून तीन षटकार दूर

खेळपट्टीचा अंदाज -

 • वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांना जास्त साथ देणारी; पण दुसऱ्या डावात दव निर्णायक
 • वानखेडेवरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७६. 
 • वानखेडेवर धावांचा पाठलाग करणारा संघ ५२.७ टक्के सामन्यात विजय.
 • या मोसमातील सलामीच्या सामन्यात धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी

​ ​

संबंधित बातम्या