IPL 2021 - परिपूर्ण संघाकडून अजून अपेक्षा; मुंबईसमोर आव्हान काय?

सुनंदन लेले
Friday, 9 April 2021

मुंबई इंडियन्सच्या कामगिरीतील सातत्य वाखाणण्याजोगे आहे. २०२१ करता मुंबई इंडियन्स संघाचे बलाबल काय आहे त्याचा आढावा.

आयपीएल स्पर्धेतील सर्वांत परिपूर्ण आणि तगडा संघ कोणता, असा प्रश्न विचारला तर किमान १० पैकी ७ जण मुंबई इंडियन्सचे नाव घेतील. मुंबई इंडियन्सच्या कामगिरीतील सातत्य वाखाणण्याजोगे आहे. २०२१ करता मुंबई इंडियन्स संघाचे बलाबल काय आहे त्याचा आढावा.

बलस्थाने : फलंदाजीतील खोली आणि मोठे फटके मारण्याची क्षमता ही दोन बलस्थाने आहेत मुंबई संघाची. क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा सलामीला. मग ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि त्यानंतर हार्दिक पंड्या-पोलार्डसारखे दांडगट फलंदाज अशी जर क्रमवारी असेल तर समोरच्या गोलंदाजांच्या मनात धडकी नाही भरली तर नवल म्हणावे लागेल. 

कमजोरी : मुंबई इंडियन्स संघाची एकमेव कमजोरी म्हणजे म्हणावा तितका त्यांचा फिरकी मारा चांगला नाहीय. राहुल चहर आणि कुणाल पंड्या भारतीय संघातून खेळलेले खेळाडू असले, तरी त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीतील एकसुरीपणा समोरच्या फलंदाजांना सहजी ओळखता येतो. दोघेही गोलंदाज चेंडू जास्त वळवू शकत नाहीत, ज्याने अंदाज घेणे सोपे जाते. मधल्या षटकात हेच दोन गोलंदाज मारा करतात तो काळ कमजोरी दाखवणारा आहे.

हे वाचा - RCB ची बलस्थाने आणि कमजोरी, तर नेमका काय आहे धोका?

संधी : ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी गेल्या आयपीएलमध्ये जबरदस्त फलंदाजी करून भारतीय संघाचे दरवाजे उघडले. जर २०२१ च्या आयपीएल स्पर्धेत त्यांनी तेच सातत्य राखले, तर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी२० वर्ल्डकप संघात त्यांची वर्णी लागू शकते. बरेच लोक रोहित शर्माकडे भारतीय टी२० संघाचे नेतृत्व असायला पाहिजे असे बोलतात. रोहितने परत एकदा मुंबई इंडियन्स संघाला विजेतेपदावर नेऊन ठेवले, तर या मागणीला जोर चढेल म्हणजे रोहित शर्माला मोठी संधी आहे.

हे वाचा - धोनीच आयपीएलचा 'बाहुबली'; सामने जिंकण्यात चेन्नई मुंबईपेक्षा वरचढ

धोका : समोरच्या संघांनी बराच विचार करून बघितला की जसप्रीत बुमरा आणि ट्रेंट बोल्टवरच जर नवा चेंडू टाकला जात असताना आक्रमण केले तर काय होईल. होय, योजना म्हणून ही कमाल आहे. कोणत्याही संघाला गतआयपीएल स्पर्धेत तसे करता आलेले नाही. हे सगळे मान्य केले तरी योजना म्हणून हा धोका मुंबई संघाबाबत आहे की त्यांचे मुख्य अस्त्र बुमरा-बोल्टच्या मार्गावर आक्रमण करून मोठ्या धावा सुरुवातीच्या षटकात जमा करता आल्या तर बाकीच्या गोलंदाजांना दडपण सहन होणार नाही. कागदावर का होईना हा एकमेव धोका मुंबई संघाबाबत विचार करताना जाणवतो.


​ ​

संबंधित बातम्या