धोनीचा विश्वविक्रम! पाच वर्षानंतरही विराट-रोहितला मोडता येणार नाही
IPL 2021 - पुढील पाच वर्ष विराट-रोहित यांनी आपापल्या संघाचं नेतृत्व केलं तरिही धोनीचा विक्रम अबाधितच राहणार.
आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरु होऊन दोन आठवडे उलटले आहेत. आतापर्यंत प्रत्येक संघाचे किमान 3 सामने झालेले आहेत. चेन्नईच्या किंग्जनं सोमवारी राजस्थानच्या रॉयल्सचा दारुण पराभव करत धोनीला मोठं गिफ्ट दिलं आहे. चेन्नईचा कर्णधार म्हणून सोमवारी धोनीचा 200 वा टी-20 सामना होता. आयपीएलमध्ये 200 सामन्यात एखाद्या संघाचं नेतृत्व करण्याचा पराक्रम फक्त धोनीच्या नावावर आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच चेन्नईचा कर्णधार धोनीने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. टी२० क्रिकेटमध्ये एकाच संघाचे 200 सामन्यात कर्णधारपद भूषवण्याचा ऐतिहासिक मान धोनीनं मिळवला आहे. 2008 मध्ये धोनीनं चेन्नईच्या संघाची धुरा सांभाळली होती. तेव्हापासून आजतागत धोनीनं यशस्वीपणे आयपीएलमध्ये चेन्नईचं नेतृत्व केलं आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले असून, तब्बल १० वेळा प्ले ऑफपर्यत मजल मारली आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा बहुमानही धोनीच्या नावावर आहे. सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू देखील आहे. धोनीने आयपीएलमध्ये चेन्नईचे १७७ सामन्यात नेतृत्व केले आहे. तर, उर्वरित २३ सामने त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये चेन्नईचा कर्णधार या नात्याने खेळले आहेत.
A match made in heaven
MS Dhoni is all set to Captain @ChennaiIPL for the 200th time.#VIVOIPL pic.twitter.com/1dS3bEzZDR
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2021
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं पुढील पाच वर्ष आपापल्या संघाचं नेतृत्व केलं तरिही धोनीचा विक्रम मोडण्याची शक्यता कमीच वाटतेय. विराट कोहली आणि रोहित शर्माला 2013 मध्ये आरसीबी आणि मुंबई संघाच्या नेतृत्वाची धुरा मिळाली होती. त्यानंतर आतापर्यंत विराट कोहलीनं 128 तर रोहित सर्मानं 117 सामन्यात कर्णधारपद भूषावलं आहे. पुढील पाच वर्ष दोघांनी आपापल्या संघाचं नेतृत्व केलं तरिही धोनीचा विक्रम अबाधितच राहणार.