IPL 2021 - कोरोनाच्या सावटाखाली आजपासून आयपीएल; काय आहे नवीन?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 April 2021

आजपासून ६० दिवस आयपीएलच्या १४ व्या हंगामाचा थरार रंगणार आहे. आठ महिन्यांच्या फरकाने दुसऱ्यांदा आयपीएलचा रोमांच क्रिकेटप्रेमी भारतीयांना अनुभवता येणार आहे.

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात एकेका दिवसाची रुग्णसंख्या लाखावर जात असताना आजपासून ६० दिवस आयपीएलच्या १४ व्या हंगामाचा थरार रंगणार आहे. आठ महिन्यांच्या फरकाने दुसऱ्यांदा आयपीएलचा रोमांच क्रिकेटप्रेमी भारतीयांना अनुभवता येणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अमिरातीत झालेल्या आयपीएलच्या वेळी देशात रुग्णसंख्या अटोक्यात येत होती, परंतु यंदाच्या स्पर्धेचा घाट देशात घातलेला असताना कोरोनाने चारही बाजूंनी घेरले आहे. अशा परिस्थितीत हे शिवधनुष कसे पेलले जाते हे महत्त्वाचे आहे. या आयपीएलची आखणी झाली तेव्हा देशातील कोरोनाची साथ अटोक्यात येत होती, परंतु आता प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होत असताना हेच चित्र कमालीचे बदलले आहे. अगोदर कोलकाताचा नितीश राणा, दिल्लीचा अक्षर पटेल, बंगळूरचा देवदत्त पदक्कल आणि आता काही दिवसांपूर्वी बंगळूर संघाचा डॅनिएल सॅन्स कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. पदिक्कल, राणा निगेटिव्ह आले असून खेळण्यास सज्ज होत आहेत, परंतु ही साथ स्पर्धेतील अन्य खेळाडूंना लागू नये यावर स्पर्धेचे भवितव्य अवंलून असणार आहे.

वानखेडेने चिंता वाढवली
साखळी सामने एकूण सहा ठिकाणी होणार आहेत. त्यातील अर्धी स्पर्धा चेन्नई, मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली येथे होणार आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्यातील सामने बंगळूर आणि कोलकाता येथे खेळले जाणार आहेत, परंतु मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १२ ग्राऊंडसमनना कोरोना झाल्याने चिंता वाढली आहे. याच मैदानावर पहिल्या टप्प्यातील १० सामने होणार आहेत. जैवसुरक्षा वातावरण अगदी काटेकोरपणे तयार करण्यात आले असले तरी संकट मात्र कायम आहे.

क्रीडा विश्वातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

टी-२० वर्ल्डकपचे भवितव्य
भारतात ऑक्टोबर महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. महामारीच्या काळात आयपीएलचे आयोजन कसे होते त्यावर वर्ल्डकप भारतात होणार की नाही याचे भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळे बीसीसीआयची प्रतिष्ठा पणास लागणार आहे.

'मुंबई वि. बंगळूर
उद्या सलामीलाच पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या बंगळूरचा सलामीला सामना होणार आहे. रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहली असे या सामन्याचे चित्र असेल. बंगळूर संघाने कात टाकण्याचा प्रयत्न केला, तरी मुंबईचे आव्हान सोपे नसेल. दुसरीकडे महेंद्रसिंग धोनी ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. अमिरातीतील स्पर्धेत त्याच्या चेन्नई संघाची पडझड झाली होती. सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 

आयपीएल 2021 संदर्भातील इतर बातम्या वाचा एका क्लिकवर

दोन नवे कर्णधार
या स्पर्धेच्या निमित्ताने रिषभ पंत (दिल्ली) आणि संजू सॅमसन (राजस्थान) असे दोन नवे भारतीय कर्णधार दिसून येणार आहेत. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे पंतवर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली; तर राजस्थानने स्टीव स्मिथला संघातून वगळल्यानंतर जॉस बटलर, बेन स्टोक्स असे मातब्बर खेळाडू असतानाही सॅमसनकडे नेतृत्व दिले आहे.

दृष्टिक्षेपात  आयपीएल २०२१

  • ९ एप्रिल ते ३० मे स्पर्धेचा कालावधी
  • ५२ दिवस ६० सामने (५६ साखळी, ४ प्लेऑफ)
  • सहा ठिकाणी सामने
  • चेन्नई, मुंबई, कोलकाता, बंगळूरमध्ये प्रत्येकी १०
  • अहमदाबाद, दिल्लीत प्रत्येकी ८ साखळी सामने
  • अंतिम सामन्यासह प्लेऑफ लढती अहमदाबादमध्ये
  • ११ रविवारी प्रत्येकी दोन सामने
  • रात्रीचे सामने ७.३० तर दुपारचे सामने ३.३० वा. सुरू

​ ​

संबंधित बातम्या