IPL 2021 : राहुल चक्रव्यूह कसा भेदणार

सुनंदन लेले
Saturday, 3 April 2021

अखेरच्या चेंडूवर षटकाराऐवजी मिळालेला चौकार त्यांना प्लेऑफपासून रोखून धरणारा होता. यंदाही ते नव्या उमेदीने मैदानात उतरून अधिक चांगली प्रगती करण्याचा प्रयत्न करतील

के.  एल. राहुलच्या नेतृत्वपदी अमिरातीत झालेल्या आयपीएलमध्ये पंजाब संघाने कमालीची कामगिरी केली होती. नशिबाची साथ मात्र त्यांना मिळाली नव्हती. शॉर्ट रनबाबत पंचांनी केलेली चूक त्यानंतर कोलकाताविरुद्ध अखेरच्या चेंडूवर षटकाराऐवजी मिळालेला चौकार त्यांना प्लेऑफपासून रोखून धरणारा होता. यंदाही ते नव्या उमेदीने मैदानात उतरून अधिक चांगली प्रगती करण्याचा प्रयत्न करतील

बलस्थाने : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे एकमेव बलस्थान त्यांची फलंदाजी आहे.  के. एल. राहुलला त्याचा कर्नाटकचा सहकारी मयांक आगरवाल सलामीला येऊन मिळतो. नंतर येतो द युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आणि त्याचा वेस्ट इंडियन सहकारी निकोलस पुरन. खरे सांगायचे तर या चार फलंदाजांवर पंजाब संघाची मोठी भिस्त आहे. चौघांमध्ये ताकद अशी आहे, की यातले दोन फलंदाज जोरात चालले, तरी पंजाबची मोठी धावसंख्या सहजी उभी राहते.

कमकुवत बाजू : गोलंदाजीत खोली नसणे, ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी दिसते. मोहम्मद शमी आणि जेह रिचर्डसनला नवीन वेगवान ऑसी गोलंदाज रायली मेरेडिथ येऊन मिळाला आहे. फिरकीत रवी बिष्णोईची लेगस्पीन आणि मुरुगन अश्विनची ऑफस्पिन अशी विविधता दिसत असली, तरी त्यात खरी खोली आढळत नाही.

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सची पंत गादी चालवणार

संधी : साध्या संघाला एकत्र करून मोठ्या संघांना मोठे धक्के देण्याची संधी पंजाब संघाला आहे. गेले तीन वर्ष के. एल. राहुल सातत्याने मोठ्या धावा संघाकरता करत आला आहे. कप्तानाची धुरा त्याची जबाबदारी वाढवत आहे आणि हीच त्याच्याकरता नेतृत्वगुणांचे कौशल्य दाखवण्याची संधी आहे. संघ निवड करताना अनिल कुंबळेने काय विचार केला, ह्या प्रश्नाला सडेतोड उत्तर चांगली कामगिरी करून देण्याची संधी पंजाबला आहे.

धोका : महत्त्वाचा गोलंदाज मोहंम्मद शमी दुखापतीतून सावरून मोठ्या क्रिकेटमध्ये तीन महिन्यांनी परततो आहे, जो काहीसा धोका वाटतो. तसेच रायली मेरडिथला भारतीय उपखंडातील खेळपट्टीवर गोलंदाजी टाकायचा अनुभव नाही, हा दुसरा धोका आहे. तिसरा धोका जर समोरच्या गोलंदाजांनी प्रमुख चारपैकी तीन फलंदाजांना बाद करण्यात पहिल्या 10 षटकात यश मिळवले, तर पंजाब संघ मोठ्या अडचणीत येऊ शकतो.


​ ​

संबंधित बातम्या