IPL 2021 : गुणवत्तेला न्याय  देणार का?

सुनंदन लेले
Monday, 5 April 2021

क्षेत्ररक्षण कोलकाता नाईट रायडर्स संघाची कमजोरी ठरू शकते. संघात वयाची तिशी पार केलेले खूप खेळाडू आहेत आणि जे तरुण खेळाडू आहेत ते अफलातून क्षेत्ररक्षणाकरता प्रसिद्ध नाहीत.

कोलकाता नाईट रायडर्स संघ कागदावर चांगलाच समतोल दिसतो. दर्जेदार खेळाडूंचा समावेश असलेला हा संघ गुणवत्तेला न्याय देणार का, हा प्रश्न आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा घेतलेला आढावा.

बलस्थाने : कोलकाता नाईट रायडर्स  संघाची खरी ताकद त्यांच्या वेगवान गोलंदाजीत आहे. पॅट कमिन्स आणि लॉकी फर्ग्युसनसारखे तगडे अनुभवी आंतरराष्ट्रीय गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्याच वेळी प्रसिद्ध कृष्णा, कमलेश नागरकोटी आणि शिवम मावसारखे तरुण गुणवान तेज गोलंदाज आहेत. साथीला सुनील नारायण, हरभजन सिंग, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे फिरकी गोलंदाज आहेत. अष्टपैलू शकीब अल हसन आहे. एकंदरीत कोलकात्याची गोलंदाजी खरोखर दर्जेदार आहे आणि तीच त्यांचे बलस्थान आहे.

कमजोरी : क्षेत्ररक्षण कोलकाता नाईट रायडर्स संघाची कमजोरी ठरू शकते. संघात वयाची तिशी पार केलेले खूप खेळाडू आहेत आणि जे तरुण खेळाडू आहेत ते अफलातून क्षेत्ररक्षणाकरता प्रसिद्ध नाहीत. आयपीएल सामन्यात कित्येक वेळी एखादा अशक्य वाटणारा झेल किंवा अफलातून रनआऊट चित्र बदलू शकतो. कोलकाता संघ बॅट किंवा चेंडूने सामन्याचा कल स्वत:कडे फिरवू शकतात, पण सुंदर क्षेत्ररक्षणाने नाही, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. 

अष्टपैलू खेळाडू राजस्थान रॉयल्सला तारणार​

संधी : टी २० क्रिकेटकरता लागणारी सर्व आयुधे कर्णधार मॉर्गनच्या भात्यात आहेत. मॉर्गनने इंग्लंड संघाला निडर बनवत वर्ल्डकप जिंकण्याची किमया करून दाखवली आहे. आता तोच मॉर्गन आपल्या नेतृत्वगुणाची जादू चालवून कोलकाता संघाला विजयाचा मार्ग दाखवतो का हे बघावे लागेल. त्या अर्थाने मॉर्गनला खूप मोठी संधी आहे. तसेच शिवम मावी, नागरकोटी आणि प्रसिद्ध कृष्णाला आपले कसब दाखवण्याची आणि भारतीय संघनिवड समितीला आपल्याकडे मान वळवून बघायला लावायची संधी आहे.

धोका : कोलकाता नाईट रायडर्स संघाला शुभमन गिलसोबत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा सलामीचा फलंदाज अजून गवसलेला नाही. कधी सुनील नरीन; तर कधी राहुल त्रिपाठीला सलामीला पाठवले जाते. दोघांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे ज्याने सुरुवातीच्या १० षटकांत चांगल्या धावांचा पाया नेहमी रचला जात नाही. तळात आंद्रे रसेल किंवा कप्तान मॉर्गन खूप मोठे फटके मारू शकतात हे सत्य असले, तरी त्यांना चांगली सुरुवात मिळाली नाही, तर मोठा धोका कोलकाता नाईट रायडर्स संघाला जाणवू लागतो हे वारंवार दिसून आले आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या