वाढदिवसाला राहुलचा मोठा विक्रम; गेलला टाकलं मागे

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 April 2021

IPL 2021 : मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात 196 धावांचा डोंगर उभा केल्यानंतरही पंजाबला परभवाला सामोरं जावं लागलं.

IPL 2021 : रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात 196 धावांचा डोंगर उभा केल्यानंतरही पंजाबला परभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबनं दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवनच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर दिल्लीनं 18 षटकात सहा गडी राखून विजय नोंदवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला सलामीवीर मयांक अग्रवाल आणि कर्णधार के. एल राहुल यांनी विस्फोटक आणि अश्वासक सुरुवात करुन दिली. दोघांनीही अर्धशतकी खेळी करत संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. कर्णधार के.एल राहुल यानं आपल्या वाढदिवसाला दिल्लीच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. राहुलनं 61 धावांची दमदार खेळी केली. यासह खास विक्रम आपल्या नावावर केला. 

राहुलनं आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान दोन षटकार आणि सात चौकार लगावले. थोडीशी संथ फलंदाजी करणारा राहुल मोक्याच्या क्षणी बाद झाला. राहुलन 51 चेंडूत 61 धावांची खेळी केली. यासह 75 डावांत सर्वाधिक अर्धशतक लगावण्याचा गेलचा विक्रम राहुलने मोडीत काढला. आयपीएलच्या पहिल्या 75 डावांत सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आता राहुलच्या नावावर आहे.  याआधी हा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर होता. 

आयपीएलमध्ये 75 डावानंतर सर्वाधिक अर्घशतकं झळकावणारे खेळाडू -  

24: केएल राहुल
23: गेल
21: मार्श
21: वॉर्नर
18: रहाणे
18: गंभीर

आयपीएलच्या पहिल्या 75 डावांत सर्वाधिक धावा चोपणारे खेळाडू -  

3065: ख्रिस गेल
2804: केएल राहुल *
2477: एस मार्श (69 पारी)
2362: वॉटसन
2240: गंभीर


​ ​

संबंधित बातम्या