IPL 2021 : तो माझ्याकडे एका डोळ्याने पाहायचा; पृथ्वीचा आगळावेगळा फंडा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 April 2021

पृथ्वी शॉबाबत दिल्ली प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी उघड केली माहिती
 

मुंबई :  फॉर्म नाही तर नेटमध्ये फलंदाजीचा सरावही नाही, असा आगळावेगळा फंडा पृथ्वी शॉचा असल्याचे दिल्ली कॅपिटल संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी जाहीर केले. येत्या आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी पृथ्वी आपल्या या सवयीत बदल करेल, असेही ते म्हणाले. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार असलेले पाँटिंग दोन मोसमापासून पृथ्वी शॉवर मेहनत घेत आहेत. गेल्या आयपीएलमध्ये दोन अर्धशतके केल्यानंतर पृथ्वी शॉचा फॉर्म हरपला होता. त्यामुळे नेटमध्ये तो सराव करणे टाळत होता; पण सुरुवातीला फॉर्म होता तेव्हा तो नेटमध्ये तासन् तास फलंदाजी करायचा, असे पाँटिंग यांनी सांगितले. 

IPL 2021 : गुणवत्तेला न्याय देणार का?

गेल्या आयपीएलमध्ये चार ते पाच सामन्यांत त्याला १० धावांच्या पुढे मजल मारता आली नव्हती. आपल्याकडून कोणत्या चुका होत आहेत, याचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी तुला नेटमध्ये मेहनत घ्यायला हवी, असे मी त्याला सांगायचो, तेव्हा तो माझ्याकडे एका डोळ्याने पाहायचा आणि मी फलंदाजी करणार नसल्याचे तो सांगायचा. पृथ्वीच्या या उत्तरावर मी काहीही करू शकायचो नाही, असे पाँटिंग यांनी म्हटले आहे. 

पृथ्वीने त्याच्या मानसिकतेत बदल केलेला दिसत आहे आणि गेल्या काही महिन्यांत त्याने बरीच मेहनत घेतलेलीही जाणवत आहे. त्याच्याकडून सर्वोत्तम खेळ करून घेऊ शकतो, तर त्याच्यामध्ये सुपरस्टार होण्याची क्षमता आहे, असे सांगणाऱ्या पाँटिंग यांचे विलगीकरण नुकतेच संपले आहे. अमिरातीत झालेल्या आयपीएलमध्येही मी त्याला अनुभवाचे बोल सांगण्याचा प्रयत्न करत होतो; परंतु तो त्याच्या विचाराशी ठाम होता. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात तर त्याने नेटमध्ये फलंदाजी करणे सोडून दिले होते. कधी कधी मी त्याच्यावर रागवायचो. तुला नेटमध्ये जायलाच लागेल. त्याचा तुला फायदा होतोय की नाही, याचा विचार तू करायचा नाही, अशी माहितीही पाँटिंग यांनी उघड केली. 
 


​ ​

संबंधित बातम्या