IPL 2021 : आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 6 April 2021

किरण मोरे मुंबई इंडियन्स मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली आहेत.

भारतीय संघाचे माजी विकेट किपर आणि मुंबई इंडियन्ससाठी प्रतिभावंत खेळाडू शोधणाऱ्या किरण मोरेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याची माहिती दिली आहे. 58 वर्षीय किरण मोरे पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकवणाऱ्या संघातील यष्टीरक्षक सल्लागार म्हणूनही काम पाहतात. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणं नसली तरी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मुंबई इंडियन्सकडून देण्यात आली आहे.  मुंबई इंडियन्सच्या निवेदनानुसार, किरण मोरे मुंबई इंडियन्स मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली आहेत. बीसीसीआयच्या नियमावलीचे ते पालन करतील. किरण मोरे हे संघातील प्रमुख सदस्यांपैकी एक आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील धकधक निश्चितच वाढली आहे.

तीन क्रिकेटर्सचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळत असून मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवरील स्टाफ मेंबर्ससह तीन क्रिकेटर्सचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले होते. आयपीएलमध्ये कोरोनाने भिती निर्माण झाली असली तरी स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होणार, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले आहे. मागील वर्षीही युएईमध्ये रंगलेल्या स्पर्धेत काही खेळाडू आणि स्टाफ सदस्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतरही स्पर्धा सुरळीत पार पडल्याचा दाखला गांगुली यांनी दिला होता. 

9 एप्रिलपासून स्पर्धेचा शुभारंभ

14 व्या आयपीएलच्या हंगामात चेन्नईच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात रंगत होणार आहे. वानखेडेच्या मैदानात चेन्नई आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 10 एप्रिल रोजी वानखेडेच्या मैदानात नियोजित आहे. महाराष्ट्र राज्यात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी मुंबईतील सामन्याला राज्य सरकारने परवानगी दिलीये.  


​ ​

संबंधित बातम्या