शास्त्री गुरुजी म्हणाले; धोनी vs पंत सामना पाहण्यापेक्षा ऐकायला मजा येईल 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 April 2021

IPL 2021 : अनुभवी धोनीच्या विरुद्ध पंत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

IPL 2021 : भारतीय क्रिकेटमधील इतिहास आणि वर्तमान अशा गुरू-शिष्यांमध्ये अर्थात महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा वारसदार म्हणून पाहिले जात असलेला ऋषभ पंत आयपीएलच्या दुसऱ्याच दिवशीच आमनेसामने येत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना होत असला, तरी अनुभवी धोनीच्या विरुद्ध पंत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाला गत आयपीएल स्पर्धेत उपविजेतेपदापर्यंत मजल मारता आली होती; तर अनुभवी चेन्नईचा संघ अमिरातीत झालेल्या त्याच स्पर्धेत सातव्या स्थानापर्यंत घसरला होता; परंतु आता दोन्ही संघात काही बदल झाले आहेत. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे ऋषभ पंतवर नेतृत्वाची जबाबदारी आहे; तर धोनीच्या संघात सुरेश रैना, ब्रावो असे खेळाडू पुन्हा एकदा संघाला गतवैभव मिळवून देण्यास सज्ज झाले आहेत. मुंबईत होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांनी मजेशीर ट्विट केलं आहे.

हेही वाचा : सीएसकेची बलस्थाने आणि कमजोरी, पाहा कसा आहे धोनीचा संघ

रवी शास्त्री यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की,  'गुरू विरुद्ध शिष्य! आज सामना पाहायला मजा येईल. आवश्य स्टंप माइक ऐका.  #DhoniReturns #Pant #IPL2021 #DCvsCSK - @ChennaiIPL @DelhiCapitals' धोनी आणि पंत स्टंपच्या मागे मजेदार कॉमेंट्स करण्यात प्रसिद्ध आहेत. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. चाहत्यांना त्यांच्या कॉमेंट्स आवडतात.

नेतृत्वपदी माझा पहिलाच सामना महीभाईविरुद्ध आहे. मी त्याच्याकडून बरेच काही शिकलो आहे. त्यामुळे उद्याचा सामना माझ्यासाठी अनुभवात आणखी भर घालणारा असेल. धोनीकडून मिळालेली शिकवण आणि माझा अनुभव एकत्र करून मी उद्याच्या सामन्यासाठी तयार आहे, असे रिषभ पंतने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या