झॅम्पा, रिचर्डसन यांची `ना घरका ना घाटका` अशी झाली अवस्था

पीटीआय
Thursday, 29 April 2021

भारतात उग्ररूप धारण करत असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हवालदिल झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन या बंगळूर संघातून खेळणाऱ्या खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला असला, तरी `ना घरका ना घाटका` अशी त्यांची अवस्था झाली आहे.

मुंबई - भारतात उग्ररूप धारण करत असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हवालदिल झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन या बंगळूर संघातून खेळणाऱ्या खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला असला, तरी `ना घरका ना घाटका` अशी त्यांची अवस्था झाली आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने व्यवस्था केली, तरच त्यांना मायदेशी जाता येईल; अन्यथा किमान १५ मेपर्यंत तरी त्यांना मुंबईतील हॉटेलमध्येच रहावे लागणार आहे.

या दोघा खेळाडूंनी वैयक्तिक कारणामुळे आयपीएल तत्काळ सोडून मायदेशी परतण्याचे ठरवले; पण त्याच वेळी ऑस्ट्रेलिया सरकारने १५ मेपर्यंत भारतात प्रवासबंदी केली. त्यामुळे आयपीएलच्या संघातून बाजूला गेल्यानंतरही त्यांना मायदेशी परतता आले नाही. २५ एप्रिल रोजी या दोघांनी बंगळूर संघ सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर बंगळूरचा संघ मुंबईतील सामने संपल्यामुळे अहमदाबाद येथे गेला. झॅम्पा आणि रिचर्डसन या दोघांना मायदेशी परतण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने विशेष परवानगी दिली आहे का, याची प्रतीक्षा क्रिकेट ऑस्ट्रेलिया करत आहे.  ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटना आणि परदेशी व्यवहार मंत्रालयाशी आम्ही संपर्कात आहोत १५ मेपर्यंत त्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले.

मुंबई ते दोहा आणि दोहा ते ऑस्ट्रेलिया मार्गाने तरी त्यांना परत आणण्याचा पर्याय तपासला जात आहे. झॅम्पा आणि रिचर्डसन यांच्या दोन दिवस अगोदर अँड्रयू टे याने आयपीएलमधून माघार घेतली आणि त्याने मायदेशी परतण्याचा हा मार्ग स्वीकारला होता.

ऑस्ट्रेलियाचे अजून बरेच खेळाडू, प्रशिक्षक, समालोचक आयपीएलशी निगडित आहेत, त्या सर्वांनाही मायदेशी परतायचे आहे की आयपीएल पूर्ण करायची आहे, याबाबतही क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा करत आहे; पण आता बहुतांशी खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचकांना आयपीएलमधून मध्येच परतायचे नसल्याचे समजते.


​ ​

संबंधित बातम्या