बंगळूरचा विजयी ‘पंच’ की चेन्नईचा विजयाचा ‘चौकार’?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 April 2021

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टेबल टॉपरमध्ये उद्या होणारा आयपीएलचा सामना तेवढाच संघर्षपूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टेबल टॉपरमध्ये उद्या होणारा आयपीएलचा सामना तेवढाच संघर्षपूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. बंगळूरने चारही सामने जिंकलेले आहेत, तर चेन्नईने गेल्या तीन सामन्यांत विजय मिळवून आपलीही गाडी रुळावर आणलेली आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात, याचीही उत्सुकता उद्याच्या सामन्यात असणार आहे.

आयपीएलच्या पहिल्यावहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या बंगळूर संघाने यंदा कमालीची सुरुवात केली. एक-दोन चुरशीचे विजय मिळवल्यानंतर मात्र एकतर्फी वर्चस्व प्रस्तापित केले आहे. फलंदाजीसह गोलंदाजीतही असलेला समतोलपणा बंगळूरच्या विजयाची शक्यता वाढवणार आहे. 

गत स्पर्धेतील अपयशी ग्लेन मॅक्सवेलला यंदा बंगळूरने संधी दिली आणि तोच संघाला नवी दिशा देणारा ठरत आहे. सोबत एबी डिव्हिल्यर्सही आपली क्षमता वारंवार सिद्ध करत आहेत. आता तर सलामीवीर देवदत्त पदिक्कलने गेल्या सामन्यात शतक करून त्यानेही फॉर्म मिळवलेला आहे. विराट कोहली तर कोणत्याही क्षणी मॅचविनर कामगिरी करू शकतो. यामुळे आता बंगळूरची फलंदाजी फारच भक्कम झाली आहे. 

मात्र या फलंदाजीला शह देण्याची क्षमता चेन्नई संघात आहे. दीपक चहर गेल्या दोन सामन्यात कमालीची स्विंग गोलंदाजी करत आहे. त्याने कोलकाता आणि राजस्थान संघाच्या सुरुवातीच्या फलदाजांची दाणादाण उडवली होती. त्याच्या साथीला सॅम करन, लुंगी एन्डिगी असे गोलंदाज आहेत. 

चेन्नईने कोलकाताविरुद्ध २२० धावा केल्या आणि त्यानंतर त्यांची ५ बाद ३१ अशी अवस्था केली खरी; मात्र आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक आणि पॅट कमिंस यांनी धोनीच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्यामुळे धोनीच्या संघाला अखेरपर्यंत सावध राहावे लागेल. अशा प्रकारची स्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता मॅक्सवेल आणि डिव्हिल्यर्समध्ये आहे. 

गेल्या आयपीएलमध्ये अडखळणाऱ्या चेन्नईची फलंदाजी यंदा बहरत आहे. ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्सेसी हे सलामीवीर भक्कम पायाभरणी करून देत आहेत. त्याचा फायदा घेण्यासाठी मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, सॅम करन, महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा असे फलंदाज आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात धावांची बरसात होऊ शकेल. 

आजचा सामना
चेन्नई वि. बंगळूर प्रतिस्पर्ध्यांत २५ लढती
१६ विजय ९
२०८ सर्वोत्तम २०५
८२ नीचांक ७०

गेल्या पाच सामन्यांपैकी तीन लढतीत चेन्नईचा विजय
ठिकाण - वानखेडे स्टेडियम, मुंबई.
वेळ - दपारी ३.३० पासून

दुपारचा सामना
हा सामना दपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांनाही समान संधी देणारी ठरलेली आहे. उद्याचा सामना दव पडायच्या आत संपणार असल्यामुळे गोलंदाजही वर्चस्व राखू शकतील. एकूणच काँटे की टक्कर असेल.


​ ​

संबंधित बातम्या