फॉर्मात असलेल्या चेन्नईला हरवणे मुंबईला आव्हानात्मक

पीटीआय
Saturday, 1 May 2021

गत आयपीएल स्पर्धेची सुरुवात ज्या दोन संघांच्या लढतीने झाली ते दोन संघ यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच आमनेसामने येत आहेत.

नवी दिल्ली - गत आयपीएल स्पर्धेची सुरुवात ज्या दोन संघांच्या लढतीने झाली ते दोन संघ यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच आमनेसामने येत आहेत. फॉर्मात असलेले चेन्नई आणि घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणणारे मुंबई यांच्यातील सामना आयपीएलच्या इतिहासाप्रमाणे रंगातदार होण्याची शक्यता आहे. 

गतवर्षीचा तो सलामीचा सामना भले चेन्नईने जिंकला; परंतु स्पर्धा संपताना ते सातव्या स्थानावर घसरले होते; तर मुंबईने विजेतेपदाचा मुकुट मिळवला होता. यंदा आत्तापर्यंतची परिस्थिती वेगळी आहे. चेन्नई पाच विजयांसह प्रगती करत आहे; तर मुंबई चेन्नईएवढेच सहा सामने खेळल्यानंतर तीनच विजय मिळवू शकले आहेत. 

मुंबईसाठी त्यांची अपेक्षाभंग करणारी फलंदाजी त्यांना घातक ठरत होती. चेन्नईतील संथ खेळपट्टीवर त्यांना धावा करणे कठीण जात होते; परंतु दिल्लीतील चांगल्या खेळपट्टीवर कालच्या सामन्यात राजस्थानची १७१ ही धावसंख्या सहज पार केली होती. राजस्थानच्या तुलनेत चेन्नईचा संघ चांगल्याच फॉर्मात आहे. त्यामुळे मुंबईला एक तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल किंवा मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्याची जिगर दाखवावी लागेल.
क्विन्टॉन डिकॉकला सापडलेला सूर ही मुंबईसाठी जमेची बाजू आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना कालच्या सामन्यात प्रभाव पाडता आला नसला, तरी चेन्नईत आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी धावा केल्या होत्या. मुंबईसाठी आता हार्दिक पंड्या आणि पोलार्ड यांना आता अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत; तरच मुंबईला विजयाची संधी असेल.

दुसरीकडे चेन्नईचे सुरुवातीचे सर्व फलंदाज फॉर्मात असल्यामुळे सॅम करन, ट्वेन ब्रावो यांना फलंदाजीची संधीही मिळत नाही. 

आजचा सामना मुंबई वि. चेन्नई
प्रतिस्पर्ध्यांत ३२ लढती
१९ विजय १३
२०२ सर्वोत्तम २०८
१४१ नीचांक ७९
ठिकाण - अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
थेट प्रक्षेपण - संध्याकाळी ७.३० पासून

  • पाचपैकी चार लढतीत मुंबईचा विजय
  • गेल्या स्पर्धेत दोघांचा एकेक विजय
  • मुंबईचे १९ पैकी १० विजय प्रथम फलंदाजी करताना
  • चेन्नईचे १३ पैकी सात विजय धावांचा पाठलाग करताना

​ ​

संबंधित बातम्या