आयपीएल खेळाडूंमध्ये कोरोनाची धास्ती वाढली

पीटीआय
Tuesday, 27 April 2021

एकीकडे सुरू असलेली आयपीएलची सर्कस आणि दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रत्येक दिवसाची साडेतीन लाख रुग्णसंख्या यामुळे आयपीएल बंद करावी, असा सूर उमटत आहे.

भारताच्या अश्विनसह ऑस्ट्रेलियाच्या तिघा खेळाडूंची माघार; बीसीसीआय मात्र ठाम
नवी दिल्ली - एकीकडे सुरू असलेली आयपीएलची सर्कस आणि दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रत्येक दिवसाची साडेतीन लाख रुग्णसंख्या यामुळे आयपीएल बंद करावी, असा सूर उमटत आहे. त्यातच हुकमी गोलंदाज आर. अश्विनने ब्रेक घेतला; तर तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी कोरोनाच्या भीतीमुळे मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला; परंतु बीसीसीआय मात्र उर्वरित स्पर्धा सुरू ठेवण्यावर ठाम आहे.

कोरोनाचा विस्फोट होत असताना मनोरंजनाचा मसाला असलेली आयपीएल स्पर्धा मात्र सुरू असल्याने निषेधाचा सूर उमटत होता; पण आता खेळाडूंपर्यंत या भीतीची झळ पोहचत आहे. माझे कुटुंब कोरोनाशी लढत आहे, अशा परिस्थितीत मी त्यांच्यासोबत असणे आवश्यक आहे, असे सांगत दिल्ली कॅपिटल संघातून खेळणाऱ्या अश्विनने ब्रेक घेतला आहे. परिस्थिती सुधारली, तर पुन्हा खेळण्याचा विचार करू, असे त्याने म्हटले आहे. 

राजस्थान रॉयल्स संघातून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्रयू टे याच्यासह त्याच्याच देशाच्या परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघातील खेळाडू केन रिचर्डसन आणि ॲडम झॅम्पा यांनीही आयपीएलला गुडबाय केले आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी काही परदेशी खेळाडू आयपीएल सोडून जाण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. 

झॅम्पा आणि रिचर्डसन यांनी थेट कोरोनाचे कारण दिले नसले, तरी वैयक्तित कारणामुळे आम्ही माघार घेत आहोत, असे सांगितले आहे; तर तर भारतातातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मला माझ्या पर्थ शहरात परत जाण्याची संधी मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. मला पर्थ बाहेर रहावे लागेल. त्यामुळे आपण आत्ताच आयपीएलमधून काढता पाय घेत आहोत, असे टे याने म्हटले आहे. 

तो पुढे म्हणतो, मायदेशात आमचीच नाकाबंदी व्हायच्या आत परतलेले बरे. ऑगस्टपासून मी क्रिकेटसाठी जैवसुरक्षा वातावरणात राहात आहे केवळ ११ दिवसच घरी होतो त्यामुळे चिंता वाढू लागल्याने घरी परतणे योग्य आहे.

ज्या खेळाडूंना आयपीएल मध्येच सोडायची आहे, त्यांच्या मार्गात आम्ही येणार नाही; परंतु आयपीएल पूर्ण होईल, असा निर्धार बीसीसीआयकडून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या तरी आयपीएलचे उर्वरित सामने होणार आहेत, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

मायदेशात कसे परतणार ही चिंता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना चांगलीच सतावत आहे, असे कोलकता संघाचे मेंटॉर डेव्हिड हसी यांनी सांगितले. आयपीएलमधील खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफमधील ऑस्ट्रेलियन खास विमानाने मायदेशी परतण्याची शक्यता आहे; पण ऑस्ट्रेलियात गेल्यावर त्यांना कठोर विलगीकरणास सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यातच आता भारतातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. या परिस्थितीत भारतातून येणाऱ्या खेळाडूंबाबत ऑस्ट्रेलिया सरकार काय निर्णय घेणार, हेही महत्त्वाचे असेल. 

आम्ही सर्व जैवसुरक्षित वातावरणात आहोत. गतवर्षी व्हिक्टोरियात लॉकडाऊन असताना ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी जी परिस्थिती अनुभवली होती, तशीच सध्या आहे. स्पर्धेत एक दिवसाआड चाचणी होत आहे; पण बाहेरचे वातावरण चिंता वाढवणारे आहे. सर्व परिस्थिती बघत आहोत. ती पाहून आपण किती लकी आहोत. आपल्याला खेळायला मिळते, लोकांना आनंद देता येतो, हेच आमच्या मनात आले, असे हसी यांनी सांगितले.

झॅम्पासाठी दीड; तर रिचर्डसनसाठी ४ कोटी
यंदाच्या लिलावात बंगळूर संघाने झॅम्पासाठी १.५; तर रिचर्डसनसाठी ४ कोटी मोजले होते. मुंबईविरुद्धच्याच सामन्यात रिचर्डसनला खेळण्याची संधी मिळाली होती. झॅम्पा मात्र अद्याप एकही सामना खेळला नव्हता. अँड्रयू टे यांच्यासाठी राजस्थानने एक कोटी मोजले होते, परंतु त्यालाही एकही सामना खेळवण्यात आलेले नाही.

न्यूझीलंड खेळाडूही धास्तावले
ऑस्ट्रेलियाप्रमाणे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंड खेळाडूंचीही संख्या मोठी आहे. त्यांच्या मनातही धास्ती सुरू झाली आहे. केन विल्यम्सन आणि ट्रेंट  बोल्टसारखे कसोटी संघात असलेले खेळाडू इंग्लंडविरुद्धची मालिका खेळायची असल्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस आयपीएल सोडण्याची शक्यता आहे.


​ ​

संबंधित बातम्या