कोलकातासाठी आनंदाची बातमी ; सुनील नरेनला मिळाला 'ग्रीन सिग्नल'

टीम ई-सकाळ
Sunday, 18 October 2020

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाने आत्तापर्यंत आठ सामने खेळले आहेत. आणि त्यांपैकी केकेआर संघाने चार सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे.

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाने आत्तापर्यंत आठ सामने खेळले आहेत. आणि त्यांपैकी केकेआर संघाने चार सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. तर तीन सामने त्यांना गमवावे लागले आहेत. शिवाय कोलकाताचा आज सामना सनरायझर्स हैदराबाद सोबत होत आहे. मात्र या सामन्या अगोदर कोलकाताच्या संघाला दिलासा मिळाला आहे. काही सामन्यांपूर्वी गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनवर आक्षेप घेतल्यानंतर सुनील नरेनला पुन्हा हिरवा कंदील मिळाला आहे.   

आयपीएलच्या गोलंदाजी अ‍ॅक्शन कमिटीने सुनील नरेनची गोलंदाजी योग्य असल्याचे म्हटले आहे. आणि शंकास्पद अ‍ॅक्शन असणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतून त्याचे नाव काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 10 ऑक्टोबर रोजी अबू धाबी येथे किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर कोलकाताचा फिरकीपटू सुनील नरेनच्या गोलंदाजीविरोधात फील्ड पंचांनी तक्रार केली होती. व या तक्रारीनंतर त्याचे नाव आयपीएलच्या चेतावणी यादीत टाकण्यात आले होते. त्यामुळे अजून एकदा जरी त्याच्या अ‍ॅक्शनवर तक्रार झाली असती तर, त्याच्यावर संपूर्ण आयपीएलची बंदी घालण्यात आली असती. पंचांच्या तक्रारीनंतर नरेन मागील काही सामन्यात कोलकाताच्या प्लेयिंग इलेव्हनचा भाग नव्हता.  

IPL2020 : नेतृत्वबदलानंतर इयॉन मॉर्गनची आज हैदराबाद विरुद्ध परीक्षा    

कोलकाताच्या संघाने आयपीएल मधील सस्पेक्ट बॉलिंग अ‍ॅक्शन कमिटीला नरेनच्या गोलंदाजीच्या कारवाईबाबत अधिकृत मूल्यांकन करण्यासाठी विनंती केली होती. नरेनच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनचे स्लो मोशन फुटेज संघाने सादर केले होते. यात त्याच्या मागील आणि बाजूच्या कोनातून गोलंदाजीचा व्हिडिओ देण्यात आला होता. आणि त्यानंतर नरेनच्या गोलंदाजीच्या सखोल अभ्यास कमिटीने केल्यानंतरच त्याला पुन्हा हिरवा कंदील दिला आहे. या कमिटीने हेही स्पष्ट केले आहे की नरेन त्याच जुन्या कृतीतून गोलंदाजी करू शकतो, ज्यामधून तो या आयपीएलमध्ये गोलंदाजी करत होता.

आज कोलकाताचा सामना सनरायझर्स हैदराबाद सोबत चालू आहे. मात्र आजच्या सामन्यात सुनील नरेनला प्लेइंग इलेव्हनमध्ये न खेळवण्याचा निर्णय कोलकाताच्या संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.    

 


​ ​

संबंधित बातम्या