कोरोनारुग्णांसाठी बंगळूर संघाचीही मदत

पीटीआय
Monday, 3 May 2021

भारतातील कोरोना रुग्ण वाढत असताना आयपीएल कशी सुरू आहे, या टीकेची तीव्रता वाढू लागल्यावर स्पर्धेतील फ्रँचाइजकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या खास जर्सीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे.

ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी निधी उभारणार, खास ड्रेसचा लीलाव
नवी दिल्ली - भारतातील कोरोना रुग्ण वाढत असताना आयपीएल कशी सुरू आहे, या टीकेची तीव्रता वाढू लागल्यावर स्पर्धेतील फ्रँचाइजकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या खास जर्सीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे.

बंगळूरचा संघ आगामी लढतीपैकी एका सामन्यात आपल्या पारंपरिक पोषाखाऐवजी निळी जर्सी परिधान करणार आहे. त्या पोषाखावर कोरोना योद्ध्यांना साथ देण्याचे आवाहन करणारा संदेश असेल. या परिधान केलेल्या जर्सीवर सर्व खेळाडू स्वाक्षरी करतील आणि त्याचा लिलाव करण्यात येईल. त्याद्वारे उभारलेला निधी आरोग्य सुविधांसाठी देण्यात येईल, असे विराट कोहलीने सांगितले.

कोरोनाग्रस्तांसाठी कशा प्रकारे मदत करता येईल याचा आम्ही सर्वच जण गेले काही दिवस विचार करीत होतो. सध्या बंगळूर तसेच अन्य शहरांत ऑक्सिजनची खूपच गरज आहे, त्यामुळे आम्ही यासाठी मदत करण्याचे ठरवले आहे, असे कोहलीने सांगितले. बंगळूरची सोमवारी अहमदाबादला कोलकात्याविरुद्ध लढत होणार आहे.

कोहलीवरील टीकेचा व्हिडीओ डिलीट
बंगळूर संघातील डॅन ख्रिस्तियन याने विराट कोहलीच्या नेतृत्त्वाबाबत टिप्पणी केलेला व्हिडीओ डिलीट करण्यात आला आहे; मात्र याबाबत कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या, असे बंगळूर संघाने स्पष्ट केले. ख्रिस्तियनच्या मुलाखतीनंतर आम्ही सर्व खेळाडूंना माध्यम नियमावलीची आठवण करून दिली होती. ही नियमावली दरवर्षी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीही देण्यात येते, असे बंगळूर संघाने स्पष्ट केले.

डॅन ख्रिस्तियनने दि ग्रेड क्रिकेटर्सला दिलेल्या मुलाखतीत कोहलीच्या नेतृत्वाबाबत टिप्पणी केली होती. आता ख्रिस्तियनने आपली मुलाखत डिलीट करण्याची विनंती केली आहे. त्याला बंगळूर संघाने ताकीद दिली आहे, असा दावा दि ग्रेड क्रिकेटर्सने केला आहे. डॅनचा बंगळूर संघासह करार आहे. त्याचा विचार करून आम्ही ही मुलाखत डिलीट करीत आहोत, असे सांगण्यात आले.


​ ​

संबंधित बातम्या