दोन पराभवानंतर विजय मिळवून मुंबई इंडियन्सची गाडी आली रूळावर

पीटीआय
Friday, 30 April 2021

सलग दोन पराभवानंतर आणि ठिकाण बदलल्यानंतर मुंबई इंडियन्सने दैवही बदलले. राजस्थान रॉयल्सचा सात विकेटने पराभव करून यंदाच्या आयपीएलमधील आपली गाडी पुन्हा रूळावर आणली.

नवी दिल्ली - सलग दोन पराभवानंतर आणि ठिकाण बदलल्यानंतर मुंबई इंडियन्सने दैवही बदलले. राजस्थान रॉयल्सचा सात विकेटने पराभव करून यंदाच्या आयपीएलमधील आपली गाडी पुन्हा रूळावर आणली. आत्तापर्यंत अपयशी ठरत असलेल्या क्विन्टॉन डिकॉकची नाबाद ७० धावांची खेळी मुंबईसाठी निर्णायक ठरली.

चेन्नईची खेळपट्टी फारच संथ होती, दिल्लीतील खेळपट्टी फलंदाजीस उपयुक्त होती. याचा फायदा घेत राजस्थानने ४ बाद १७१ धावा केल्या मुंबईने हे आव्हान नऊ चेंडू राखून पार केले. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांकडून सातच फलंदाज बाद झाले. आजच्या सामन्यासह गेल्या दोन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बरोबर १७१ हीच धावसंख्या केली होती.

चेन्नईत अडखळत फलंदाजी करणाऱ्या मुंबईला १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरवातीला अडचणी आल्या रोहित शर्मा केवळ १४ धावाच करू शकला, परंतु डिकॉक चांगल्याच फॉर्मात होता. आपल्या अगोदरच्या ५४ चेंडूत एकही षटकार न मारू शकलेल्या डिकॉकने आज १० चेंडू खेळल्यानंतर पहिला षटकार मारला.

त्या अगोदर ख्रिस मॉरिसनने रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादव यांना बाद करून मुंबईवर दडपण टाकले होते. आज तिसऱ्या क्रमांकावर कृणाल पंड्याला बढती देण्यात आली त्याने २६ चेंडूत ३९ धावा करून डिकॉकला चांगली साथ दिली या दोघांनी मुंबईचा विजय निश्चित केला. 

जॉस बटलर आणि यशस्वी जैसवाल या राजस्थानच्या सलामीवीरांनी ६६ धावांची सलामी दिली. त्यानंतर संजू सॅमसननेही आक्रमक ४२ धावांची खेळी केली त्यामुळे राजस्थानने १८ व्या षटकापर्यंत ३ बाद १४८ पर्यंत मजल मारली होती.  शिवम दुबेने ३५ धावांचा तडाखा दिला.

संक्षिप्त धावफलक - राजस्थान २० षटकांत ४ बाद १७१ (बटलर ४१ -३२ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, यशस्वी जैसवाल ३२ -२० चेंडू, २ चौकार, २ षटकार, सॅमसन ४२ -२७ चेंडू, ४ चौकार, शिवम दुबे ३५ -३१ चेंडू २ चौकार, २ षटकार, बुमरा १५-१, राहुल चहर ३३-२) पराभूत वि. मुंबई - १८.३ षटकांत ३ बाद १७२ (डिकॉक ७० -चेंडू, ६ चौकार, २ षटकार, सूर्यकुमार १६ -१० चेंडू, ३ चौकार, कृणाल पंड्या ३९ -२६ चेंडू, २ चौकार, २ षटकार, मॉरिस ३३-२)


​ ​

संबंधित बातम्या