IPL 2020 : 2 सामने 3 सुपर ओव्हर; क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच असं घडलं!

सुशांत जाधव
Monday, 19 October 2020

सुपर ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बुमराहने पंजाबच्या संघाला 5 धावात रोखलं. क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मासाठी हे आव्हान फार जड जाईल,असे वाटत नव्हते. मात्र शमीनं त्यांना रोखून दाखवले.

डबल हेडरच्या संडेमध्ये सुपर ओव्हर्सच्या दोन लागोपाठ सामने पाहायला मिळाले. रविवारी दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने त्यांची बरोबरी केली. त्यानंतर सुपर ओव्हर्समध्ये लॉकी फर्ग्युसनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर नाईट रायडर्सने प्रतिस्पर्धी हैदराबादला 3 चेंडूत दोन धावांवरच थांबवले. सुपर ओव्हरमधील निच्चमतम धावसंख्या पार करत कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक जोडीनं संघाला विजय मिळवून दिला. 

दुसऱ्या सत्रात खेळवण्यात आलेला मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन यांच्यातील सामन्याचा निकालही सुपर ओव्हरमध्ये लागला. विशेष म्हणजे या सामन्यात क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच निकालासाठी दोन सुपर ओव्हर खेळवण्याची वेळ आली.  मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 बाद 176 धावसंख्या केली. पोलार्ड आणि कुल्टर नील यांच्या 21 चेंडूतील 51 धावांच्या भागीदारीच्या जोरावर मुंबईने इथपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या कर्णधार लोकेश राहुलनं पुन्हा एक अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेला. विजय दृष्टिक्षेपात दिसत असताना लोकेश राहुल बाद झाला आणि सामना पुन्हा मुंबईच्या बाजूने कलला. दीपक हुड्डा आणि जार्डन यांनी कसाबसा सामना टाय करत तो सुपर ओव्हरमध्ये नेला. पंजाबनेही 6 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 20 षटकात 176 धावांपर्यंत मजल मारली. 

Image

 

सुपर ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बुमराहने पंजाबच्या संघाला 5 धावात रोखलं. क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मासाठी हे आव्हान फार जड जाईल,असे वाटत नव्हते. मात्र शमीनं त्यांना रोखून दाखवले.

Image

शमीच्या  षटकातील शेवटच्या चेंडूवर सुपर रन आउटनं सुपर ओव्हरमध्येही टायची अनुभूती आली. पूरनच्या थ्रोवर लोकेश राहुलनं क्विंटन डिकॉकला अप्रतिमरित्या धावबाद केले. हा सामन्यातील एक अविस्मरणीय आणि सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये जाण्याची वेळ आणणारा प्रसंग क्रिकेट प्रेमींनी अनुभवला. 

Image

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईच्या संघावर प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली पोलार्ड आणि हार्दिक पांड्या मैदानात उतरले. त्यांना रोखण्यासाठी लोकेश राहुलनं जार्डनच्या हाती चेंडू सोपवला. जार्डन याने पॉलार्डला पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर फेकला. यावर त्याला केवळ एक धाव घेता आली. दुसरा चेंडू वाइड टाकत जार्जननं एक अवांतर धाव दिली. त्यानंतर पांड्यानं एक धाव घेत स्ट्राईक पोलार्डकडे दिले. तिसऱ्या चेंडूवर पोलार्डनं खणखणीच चौकार खेचला. पुन्हा जार्डनने वाइड चेंडू टाकला आणि मुंबईची धावसंख्या 8 धावांवर पोहचली. पोलार्डनं टोलावलेल्या चौथ्या चेंडूवर दुहेरी धाव घेताना पांड्या बाद झाला. पाचवा चेंडू निर्धाव खेळल्यानंतर पोलार्डने अखेरच्या चेंडूवर उत्तुंग फटका खेळला. मयांक अगरवालने हवेत झेपावत संघासाठी चार धावा वाचवल्या. या धावा पंजाबचा दबाव कमी करण्यासाठी मोलाच्या ठरल्या. 

Image

पंजाबला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये 12 धावांचे टार्गेट मिळाले. ही धावसंख्या परतवून लावण्यासाठी मयांक आणि गेल ही जोडी मैदानात उतरली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने चेंडू बोल्टच्या हाती सोपवला. गेलनं  पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत दबाव कमी केला. दुसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन चौकार खेचत मयांकने संघाला सुपर डुप्पर विजय मिळवून दिला. 

Image


​ ​

संबंधित बातम्या