आयपीएल 50 दिवसांवर, मात्र स्टार अंधारात?

संजय घारपुरे
Monday, 27 July 2020

आयपीएल पन्नास दिवसांवर आली आहे, पण भारतीय क्रिकेट मंडळ तसेच आयपीएल प्रशासकीय समितीने या लीगचा कार्यक्रम अधिकृतपणे स्टार इंडियास कळवला नसल्याचे समजते. या कार्यक्रमाची अद्याप भारतीय मंडळाकडून अधिकृत घोषणाही झालेली नाही.

मुंबई : आयपीएल पन्नास दिवसांवर आली आहे, पण भारतीय क्रिकेट मंडळ तसेच आयपीएल प्रशासकीय समितीने या लीगचा कार्यक्रम अधिकृतपणे स्टार इंडियास कळवला नसल्याचे समजते. या कार्यक्रमाची अद्याप भारतीय मंडळाकडून अधिकृत घोषणाही झालेली नाही.

आयपीएल प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी एका मुलाखतीत लीगचा कार्यक्रम जाहीर केला. प्रशासकीय समितीची लीगबाबत चर्चा झालेली नाही. भारतीय क्रिकेट मंडळानेही अधिकृतपणे या लीगबाबत काहीही जाहीर केलेले नाही. या लीगच्या प्रक्षेपणाचा आधिकार असलेल्या स्टार इंडियास याबाबत काहीही अधिकृतपणे न कळवणे धक्कादायक मानले जात आहे. 

ENGvsWI 3rd Test :स्टुअर्ट ब्रॉडच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंड मजबूत स्थितीत 

आयपीएल केवळ पन्नास दिवसांवर आली आहे. लीगद्वारे फायदा करायचा असेल तर त्याचे प्रमोशन आत्तापासून सुरु होण्याची गरज आहे. त्याचबरोबर जाहीरातदारांना याबाबत पूर्ण कल्पना देण्याचीही आवश्यकता आहे. ज्याद्वारे ते त्यानुसार योजना तयार करु शकतील. मात्र आता याबाबत आम्हीच गोंधळात आहोत आणि कसलीही शाश्वती वाटत नसल्याचे स्टार इंडियाच्या आधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. 

आयपीएल प्रलंबीत केल्याची घोषणा भारतीय क्रिकेट मंडळाने पत्रकाद्वारे केली होती. आता आयपीएल होणार असल्याबाबत भारतीय मंडळ काहीही अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही. आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीची तारीखही अजून निश्चित नाही. सध्याची परिस्थिती वेगळी आहे, हे मान्य. त्या परिस्थितीत काही निर्णय वेगाने घेणे भाग आहे. मात्र त्यानंतरही लीग संबंधित सर्वांशी एकत्रितपणे चर्चा करण्याची गरज आहे, असेही मत व्यक्त होत आहे. 

अमीरातीला मंजूरीचे पत्र पाठवल्याची माहीतीही मुलाखतीतून
संयुक्त अरब अमीरातीने आयपीएल घेण्याची तयारी एप्रिलमध्ये दाखवली होती. आता त्याचा प्रस्ताव मंजूर केल्याचे पत्र अमीराती क्रिकेट मंडळास भारतीय क्रिकेट मंडळाने दिले आहे. मात्र याबाबतही घोषणा भारतीय मंडळाने केली नाही. ब्रिजेश पटेल यांनी अमीरातीमधील खलीज टाइम्सला दिलेल्या मुलाखतीद्वारे ही माहिती दिली.


​ ​

संबंधित बातम्या