सांगलीच्या या ध्येयवेड्यानं घर विकलं आणि बॅडमिंटन कोर्ट सुरु केलं..!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 February 2019

पोटापाण्यासाठी बिहारमधून अनेकजण महाराष्ट्रात येतात. परंतु मी बॅडमिंटन खेळण्यासाठी आठव्या वर्षी ठाण्यात आलो. सांगलीतल्या पालकांनी मला पाच वर्षांपूर्वी प्रशिक्षणासाठी आणले. इथल्या मुलांमध्ये टॅलेंट आहे, परंतु त्यांना खेळण्यासाठी पुरेसे कोर्ट नाहीत.

पोटापाण्यासाठी बिहारमधून अनेकजण महाराष्ट्रात येतात. परंतु मी बॅडमिंटन खेळण्यासाठी आठव्या वर्षी ठाण्यात आलो. सांगलीतल्या पालकांनी मला पाच वर्षांपूर्वी प्रशिक्षणासाठी आणले. इथल्या मुलांमध्ये टॅलेंट आहे, परंतु त्यांना खेळण्यासाठी पुरेसे कोर्ट नाहीत. त्यामुळे बक्षिसे आणि प्रशिक्षणातून मिळालेली रक्कम तसेच बिहारमधील घर विकून मी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट विश्रामबागला बनवले. स्वत:चे बॅडमिंटन कोर्ट असावे हे माझे स्वप्न सांगलीकरांच्या प्रेमाने पूर्ण झाल्याचे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक धीरजकुमार सांगत होता.. 

शाळेत असताना बॅडमिंटन खेळू लागलो. आठव्या वर्षी बिहार सोडून ठाण्यात आलो. दोन वर्षांत ऑल इंडिया स्पर्धेत विजेतेपद मिळवले. राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले. खेळताना रेल्वेत नोकरी किंवा प्रशिक्षक असे दोन पर्याय होते. परंतु प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. 2013 मध्ये सांगलीतील डॉ. आशीष मगदूम यांनी मला शिबिरासाठी 2013 मध्ये बोलवले. त्यानंतर औरंगाबादला प्रशिक्षणाची संधी असताना सांगलीची निवड केली. 
सांगलीतील मुलांमध्ये टॅलेंट असून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी नोंदवू शकतात. परंतु त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ कोर्टवर खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. सांगलीत क्रीडा संकुल, ऑफिसर्स क्‍लब आणि औद्योगिक वसाहतीमध्ये प्रशिक्षण देताना स्पर्धेपूर्वी खेळाडूंना अधिक काळ सरावास वेळ मिळत नसल्याचे निदर्शनास आले. स्वतंत्र बॅडमिंटन कोर्टची आवश्‍यकता होती. स्वत:चे बॅडमिंटन कोर्ट असावे हे स्वप्नही बाळगले होते. त्यामुळे धाडसी निर्णय घेतला. 

बक्षिसे आणि पाच वर्षे प्रशिक्षणातून मिळालेली रक्कम एकत्र केली. बॅंकेतून पुरेसे कर्ज मिळण्यात अडचणी होत्या. त्यामुळे बिहारमधील गावातले घर विकले. सांगलीतील काहीजणांची मदत घेऊन जवळपास एक कोटी खर्च करून विश्रामबागला बॅडमिंटन कोर्ट बनवले. मी भाड्याने फ्लॅटमध्ये राहतोय, परंतु खेळाडूंसाठी म्हणून कोर्ट बनवले. राज्यातील हे पहिले खासगी बॅडमिंटन कोर्ट आहे. स्पर्धा खेळणाऱ्यांना चार ते सहा तास सहज सराव करता येईल. सध्या 230 खेळाडू माझ्याकडे सराव करतात. दिल्ली, औरंगाबाद, मराठवाडा परिसरातून येथे खेळाडू येतात. त्यांच्यातून भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनतील असा विश्‍वासही धीरजकुमार यांनी व्यक्त केला. 
 

सिंथेटिक कोर्ट- 
आंतरराष्ट्रीयस्तरावर सिथेंटिक कोर्टवरच स्पर्धा खेळवल्या जातात. त्यामुळे 12 ते 13 लाख रुपये खर्चून तीन सिंथेटिक कोर्ट बनवले आहेत. वार्मअपसाठी ट्रॅक बनवला आहे. छोटीसी जीम देखील उभारली जाणार आहे. नुकतेच धीरजकुमार बॅडमिंटन ऍकॅडमीचे उद्‌घाटन झाले. दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त श्रीकांत वाड, माणिक परांजपे, डॉ. आशिष मगदूम आदी उपस्थित होते.


​ ​

संबंधित बातम्या