INDvsSA : जखमी असून झुंज देणारा कलात्मक क्रिकेटपटू, केशव महाराज

मुकुंद पोतदार
Saturday, 12 October 2019

INDvsSA : कुटुंबवत्सल, श्वानप्रेमी, पाककला अशीही कौशल्ये असलेला दक्षिण आफ्रिकेचा स्पीनर केशव महाराज म्हणजे आगळे रसायन होय.

कुटुंबवत्सल, श्वानप्रेमी, पाककला अशीही कौशल्ये असलेला दक्षिण आफ्रिकेचा स्पीनर केशव महाराज म्हणजे आगळे रसायन होय. भारत दौऱ्यातील कसोटी मालिकेत आव्हान पणास लागले असताना त्याने अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्या दिवशी खांदा दुखावला असूनही तो फलंदाजीला उतरला. चेंडू अडविण्यासाठी झेप घेतल्यानंतर त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. तिसऱ्या दिवशी संघाची 6 बाद 128 अशी घसरगुंडी उडाल्यानंतर तो आठव्या क्रमांकावर उतरला. कर्णधार फाफ डू प्लेसी परतल्यानंतर त्याला व्हरनॉन फिलँडरने साथ दिली.

या जोडीच्या शतकी भागिदारीत केशवने सुत्रधाराची भूमिका बजावली. त्याने कारकिर्दीतील पहिलेवहिले अर्धशतक झळकावले. डर्बनमध्ये जन्मलेल्या केशवचे वडील आत्मानंद, आई कांचन आणि वाग्दत वधू लेरीशा हे सुद्धा या दौऱ्यावर आले. केश अशा टोपणनावाने त्याला बोलाविले जाते. त्याच्या क्रिकेटची सुरवात घराच्या अंगणात झाली. आत्मानंद प्रांतिक स्पर्धेत खेळले. त्यावेळी वर्णभेदामुळे दक्षिण आफ्रिकेवर बंदी होती. दक्षिण आफ्रिकन क्रीडा मंडळाच्या देखरेखीखाली वर्णभेदरहीत खेळांचे आयोजन केले जायचे. आत्मानंद सामने खेळायचे तेव्हा केशवला बरोर घेऊन जायचे. त्यांनीच केशवबरोबर खेळण्यास सुरवात केली. तेव्हा सुविधा जेमतेम होत्या, पण केशवचा उत्साह उदंड होता. आत्मानंद स्वतः केशवच्या गोलंदाजीवर विकेटकीपरची भूमिका पार पाडायचे.

केशव सुरवातीला डावखुरा सीम गोलंदाज होता. शाळेत नेटप्रॅक्टीस करताना लहर आली म्हणून त्याने स्पीन मारा केला. मग तो स्पीनर बनला. 
केशवकडे रिओ नावाचा जर्मन शेफर्ड आहे. तो त्याला केएफसीमधील पदार्थांची मेजवानी देतो. केशव हा कुटुंबवत्सल आहे. कुटुंबीयांचा पाठिंबा आणि योगदानाची तो कदर करतो. त्याचा आणखी एक पैलू म्हणजे तो पाककलेत निपूण आहे.  

अश्विन, जडेजा प्रमाण
केशव प्रतिस्पर्धी संघातील अश्विन-रविंद्र जडेजा यांना प्रमाण मानतो. या दोघांचे सातत्य त्याला कौतुकास्पद वाटते. अश्विनकडे बरेच वैविध्य आहे, तर जडेजाची पद्धत साधीसोपी आहे, पण सातत्य महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच तुम्ही फलंदाजांची कोंडी करू शकता, असे सांगून त्यांचा कित्ता गिरविण्याचा प्रयत्न असतो, असे तो नमूद करतो.


​ ​

संबंधित बातम्या