अश्विनचा भेदक मारा, इंग्लंड 9 बाद 285

सुनंदन लेले
Wednesday, 1 August 2018

ज्यो रूटने कसोटी क्रिकेटला साजेशी फलंदाजी करून चहापानाला इंग्लंडला 3 बाद 163 ची मजल गाठून दिली होती. चहा पिऊन आल्यावर नजर बसलेल्या दोघा फलंदाजांनी धावांचा वेग सहजी वाढवला. ज्यो रूट ८० धावांवर आणि धावसंख्या ३ बाद २१६ झाली असताना नाट्य घडले. बेअरस्टोने चोरटी दुसरी धाव पळण्याकरता ज्यो रूटला हाक मारली. विराट कोहलीने मिडविकेटला जोरात पळत जाऊन चपळाईने चेंडू फेकला तो थेट स्टंपला लागला आणि ज्यो रूट धावबाद झाला.

एजबास्टन : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा इंग्लंडने निर्णय घेतला जो आश्चर्याचा नव्हता. कर्णधार ज्यो रूट (८० धावा) आणि जॉनी बेअरस्टो (७० धावा) चांगली फलंदाजी केल्याने इंग्लंडला ३ बाद २१६ अशी मजबूत धावसंख्या उभारता आली होती. विराट कोहलीने ज्यो रूटला धावबाद केले आणि तिथेच भारतीय संघाच्या पुनरागमनाच्या आशा पल्लवीत झाल्या. चार फलंदाजांना बाद करणार्‍या अश्विनने केलेल्या भेदक गोलंदाजीने इंग्लंड संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखता आले. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने 9 बाद 285 धावा केल्या होत्या.  

एजबास्टन मैदानावरील खेळपट्टीचा अंदाज घेऊन फलंदाजी करायचा निर्णय जाहीर केला. इंग्लंड आणि भारतीय संघात प्रत्येकी फक्त एका फिरकी गोलंदाजाला जागा मिळाली. भारतीय संघ व्यवस्थापनाने अश्विनच्या अनुभवाला प्राधान्य दिले. चेतेश्वर पुजारावर संघातून बाहेर ठेवले जाण्याची कुर्‍हाड कोसळली. विराट कोहलीने मुरली विजय, शिखर धवनला सलामीला कायम ठेवताना गुणवान लोकेश राहुलला पसंती दिली.

खेळाच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी केलेला मारा स्टंपच्या दिशेने कमी होता. त्यातून ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर फक्त 8 धावांवर खेळणार्‍या जेनींग्जचा कठीण झेल अजिंक्य रहाणेने सोडला. इंग्लंडची सलामी जम बसवू लागलेली बघून विराट कोहलीने अश्विनला गोलंदाजीला आणले. अश्विनने अफलातून ऑफस्पीन चेंडू टाकून अ‍ॅलिस्टर कुकला बोल्ड केले तो चेंडू टप्पा पडल्यावर वळाला आणि त्याने ऑफ स्टंपचा वेध घेतला. त्यानंतर जेनींग्ज - रूटने मस्त फलंदाजी करून भागीदारी रचली. फारच कमी वेळा गोलंदाजांनी या जोडीला चकवले. 

मोहंमद शमीने जोडी फोडताना जेनींग्जला (42धावा)बाद केले तो चेंडू जेनींग्जच्या पायाला लागून काहीसा वळून स्टंपवर आदळला आणि फक्त एक बेल अलगद खाली पडली. डेव्हीड मलानला बाद करताना शमीने वेळ घालवला नाही. मलान पायचित झालेला शमीचा चेंडू झपकन आत येणारा होता.क़प्तान ज्यो रूटने अर्धशतक पूर्ण करतानाच 6हजार धावांचा टप्पाही पार केला. 

ज्यो रूटने कसोटी क्रिकेटला साजेशी फलंदाजी करून चहापानाला इंग्लंडला 3 बाद 163 ची मजल गाठून दिली होती. चहा पिऊन आल्यावर नजर बसलेल्या दोघा फलंदाजांनी धावांचा वेग सहजी वाढवला. ज्यो रूट ८० धावांवर आणि धावसंख्या ३ बाद २१६ झाली असताना नाट्य घडले. बेअरस्टोने चोरटी दुसरी धाव पळण्याकरता ज्यो रूटला हाक मारली. विराट कोहलीने मिडविकेटला जोरात पळत जाऊन चपळाईने चेंडू फेकला तो थेट स्टंपला लागला आणि ज्यो रूट धावबाद झाला. नंतर ७० धावांची आक्रमक खेळी करणार्‍या बेअरस्टोने उमेश यादवचा चेंडू स्टंपवर ओढवून घेतला. आणि धोकादायक जोस बटलर दुसर्‍याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. ३ फलंदाज ८ धावात तंबूत परतल्याने भारतीय संघाच्या जिवात जीव आला. इतकेच नाही तर खेळपट्टीवर उभे राहण्याच्या ठाम इराद्याने आलेल्या बेन स्टोकसही अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. 

७ बाद २४३ धावसंख्येवरून इंग्लंडचा पहिला डाव लवकर संपवण्याच्या आशा निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी कप्तान कोहलीने गोलंदाजीत केलेले बदल समजले नाहीत. बर्‍याचवेळा चांगली लय सापडलेल्या अश्विन आणि शमीला विराटने अचानक गोलंदाजी करताना थांबवले आणि हार्दिक पंड्याचा अजिबात प्रभाव पडत नसताना त्याला विराटने १० षटके टाकायला दिली. सॅम करन आणि आदील रशीदने ३५ धावांची बहुमूल्य भागीदारी करून इंग्लंडला अडचणीतून बाहेर काढले. रशीदला ईशांतने पायचित केल्यावर पहिल्या दिवस अखेरीला इंग्लंडला 9 बाद 285 धावांवर रोखण्यात यश आले.

संबंधित बातम्या