लॉर्डसला पावसाने केला बेरंग

सुनंदन लेले
Thursday, 9 August 2018

लंडन : कसोटी सामना आणि तोसुद्धा लॉर्डससारख्या ऐतिहासिक मैदानावर म्हणल्यावर वातावरण क्रिकेटमय होऊन जाते. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला प्रेक्षक जसे नटून थटून जातात तसे मेरलीबोन क्रिकेट क्‍बलचे जुने जाणते सदस्य चकाचक कपडे आणि एमसीसीचा खास चट्टेरी टाय घालून सेंट जॉन्स वूड स्टेशनला उतरून लॉर्डस मैदानाकडे जाताना दिसतात तेव्हा उत्साह जाणवतो. दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ प्रत्यक्ष अनुभवायला लॉर्डस मैदानाकडे जाणाऱ्या 12 हजार प्रेक्षकांचे आणि टीव्हीवर बघायला उत्सुक असणाऱ्या लाखो क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहावर इंग्लंडच्या पिरपिऱ्या पावसाने पाणी ओतले.

गुरुवारी दुसऱ्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार म्हणून लोकांमध्ये उत्सुकता होती. भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला दिलेली टक्कर लोकांना भावली होती. भारतीय संघात बदल होणार का? कोण नव्याने संघात दाखल होणार अशी चर्चा करत प्रेक्षक लॉर्डस मैदानाकडे जाताना दिसले. गेले 9 आठवडे पावसाने लंडनला हुलकावणी दिली होती. पावसाला लंडनची आठवण नको त्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्ट गुरुवारीच व्हावी, हा योगायोग म्हणावा लागेल.

लॉर्डस मैदानावर सचिन तेंडुलकर सामना चालू करायची ऐतिहासिक घंटा वाजवायला येऊन बसला होता. "चांगलीच निराशा झाली. खेळ झाला नाही की कंटाळा येतो. बऱ्याच दिवसांनी मी कसोटी सामन्याचा संपूर्ण दिवस खेळ बघायच्या उद्देशाने लॉर्डस मैदानावर आलो होतो. पण पावसाने बेरंग केला. मला अजून वाईट एवढ्याकरिता वाटत आहे की मी लगेच शुक्रवारी भारतात परत जाणार आहे म्हणजे मला लॉर्डस मैदानावर हजर राहून सामना बघायचा योग जमून यायला वाट बघावी लागणार आहे, असे सचिन म्हणाला.

भारतीय संघातील खेळाडू सकाळपासून मैदानावरील पॅव्हेलियनच्या बाल्कनीत बसून गप्पा मारताना दिसले. कौतुकाची गोष्ट अशीही की मैदानावर जमा झालेल्या प्रेक्षकांनी पाऊस थांबायची 5 तास कोणताही धांगडधिंगा न करता संयम दाखवत वाट बघितली. पत्रकार कक्षात सामना होत नसल्याने न्यायालयाने बीसीसीआय विरोधात दाखल केलेल्या केसचा जो निकाल दिला त्याची चर्चा रंग भरत होती.

लॉर्डस कसोटी सामन्याचा पहिला दिवस पावसाने वाया गेला आहे. क्रिकेट रसिकांकरता चांगली बातमी अशी आहे की शुक्रवारी सकाळी खेळ चालू होण्याच्या वेळेला पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

संबंधित बातम्या