कबुतरांमध्ये मांजर सोडू नका

सुनंदन लेले
Monday, 6 August 2018

संघ व्यवस्थापनाने पुजाराला वेगाने धावा पळण्यावरून धारेवर धरले. पुजाराने प्रयत्नपूर्वक वजन कमी करून पळण्याचा वेग वाढवला. फक्त सतत रनिंग बिटविन द विकेटस्चा विषय मनात घोळत असल्याने शक्य नसलेल्या धावा पळताना पुजारा दक्षिण आफ्रिकेतील एका कसोटी सामन्यातील दोनही डावात धावबाद झाला.

भारतीय संघाची मुख्य समस्या फलंदाजीची आहे हे आता पहिल्या सामन्यानंतर उघड झाले असताना ती सोडवायची कशी यावरून बराच ऊहापोह चालू झाला आहे. काही जाणकारांचे म्हणणे योग्य खेळाडूंची 11 जणांच्या संघात निवड करणे असून काही जाणकार भारतीय संघ व्यवस्थापनाच्या संघ हाताळणीवरून टीका करत आहेत. विराट कोहली सोडून बाकी फलंदाज योग्य मन:स्थितीत नसायला संघ व्यवस्थापन कारणीभूत आहे असे म्हणणे जोर धरत आहे. 

गेले जवळपास वर्षभर भारतीय संघातील फलंदाज आपापल्या जागी स्थिर नाहीत. प्रमुख फलंदाजांमधे विराट कोहली सोडून कोणाचीच जागा 100% पक्की नाही असे वाटू लागले आहे. मुरली विजय, शिखर धवन आणि लोकेश राहुल या तिघांना सलामीच्या जोडीकरता आलटून पालटून निवडले गेले. मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माला संधी देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेत रोहित शर्माला खेळवताना अजिंक्य रहाणेला वगळले गेले ज्यावरून संघ निवडीबद्दल मोठी नाराजी प्रकट केली गेली. इंग्लंडमधे आल्यावर चेतेश्वर पुजाराला संधी नाकारली गेल्यावरून टीका होत आहे.
 
म्हणायला गेले तर असेही आहे की वर नमूद केलेल्या 6 फलंदाजांनी हाती आलेल्या संधीचे कधी सोने केले तर कधी माती. कोणीच सातत्य दाखवले नसल्याने जागा पक्की झाली नाही. म्हणजेच भारतीय फलंदाजी स्थिर नाही हे सत्य आहे. फलंदाज आत्मविश्वासपूर्ण खेळ का करत नाहीत याला कारणे आहेत. चेतेश्वर पुजारा चपळ खेळाडू नाही. संघ व्यवस्थापनाने पुजाराला वेगाने धावा पळण्यावरून धारेवर धरले. पुजाराने प्रयत्नपूर्वक वजन कमी करून पळण्याचा वेग वाढवला. फक्त सतत रनिंग बिटविन द विकेटस्चा विषय मनात घोळत असल्याने शक्य नसलेल्या धावा पळताना पुजारा दक्षिण आफ्रिकेतील एका कसोटी सामन्यातील दोनही डावात धावबाद झाला. पुजाराला धावा पळण्याच्या तंत्रावरून दडपणाखाली टाकण्यापेक्षा त्याच्या चिवट फलंदाजीचा वापर करून घेणे संघ व्यवस्थापनाला जमायला पाहिजे. 

अजिंक्य रहाणे अत्यंत गुणवान फलंदाज आहे आणि दौर्‍यावर गेल्यावर त्याचा खेळ बहरतो. पण अजिंक्यकडून सातत्य राखले जात नाही. एक कमाल खेळी सादर केल्यावर कोणतीच मालिका तो मोठ्या धावा करून दणाणून सोडत नाही. शिखर धवन आक्रमक फलंदाजी करताना मोठी जिगर दाखवतो. तो मैदानात फलंदाजी करू लागला की धावा जमा होण्याचा वेग वाढतो. शिखरला विराट कोहली बर्‍याचवेळा झुकते माप देतो. एका मोठ्या खेळीनंतर शिखर पुढच्या सामन्यात धावा करत नाही ही संघ व्यवस्थापनाकरता डोकेदुखी झाली आहे. 

सतत डोक्यावर टांगती तलवार असल्याची भावना फलंदाजांच्या आत्मविश्वासाला धक्का देत आहे. फलंदाजी अस्थिर असताना भेदरलेल्या फलंदाजांमध्ये अविश्वासाचे वातावरण म्हणजे कबुतरांमधे मांजर सोडल्यासारखे होत आहे. लॉर्डस कसोटी सामना जिंकायचा असेल तर एका बाजूला फलंदाजांनी सातत्य दाखवायला हवे आणि विराट कोहली - रवी शास्त्रीच्या जोडीला फलंदाजांना विश्वासात घ्यावे लागेल.

संबंधित बातम्या