शास्त्रींसमोर नवे आव्हान; इंग्लंड दौऱ्यानंतर चौफेर टीका 

वृत्तसंस्था
Thursday, 13 September 2018

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यातील अपयश विसरण्यासाठी थोडीशी उसंतही मार्गदर्शक रवी शास्त्री यांना मिळणार नाही. विराट कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आशियाई करंडकात यशस्वी करण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागणार आहे. 

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यातील अपयश विसरण्यासाठी थोडीशी उसंतही मार्गदर्शक रवी शास्त्री यांना मिळणार नाही. विराट कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आशियाई करंडकात यशस्वी करण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागणार आहे. 

आधी दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंड या दोन परदेशातील पराभवानंतर शास्त्री यांच्यावरील दडपण अधिकच वाढत आहे. याचवर्षी नोव्हेंबरमधील ऑस्ट्रेलिया दौरा, पुढील वर्षीची विश्‍वकरंडक स्पर्धा ही दोन मोठी आव्हाने त्यांची वाट पहात असली, तरी त्यापूर्वी आशिया करंडक स्पर्धेत त्यांच्या प्रशिक्षकपदाची सत्वपरीक्षा लागणार आहे. 
या भारतीय संघाने गेल्या पंधरा वर्षांतील परदेशातील सर्वोत्तम कामगिरी केली या शास्त्री यांच्या वक्तव्याची चिरफाडच टीकाकारांनी केली आहे. समालोचक हर्षा भोगले म्हणाले, "भारताच्या काही आठवणी असतीलही, पण मालिकेचा 4-1 हा निर्णय नक्कीच चांगला नाही. परदेश दौऱ्यातील लागोपाठचे दोन पराभव नक्कीच निराशाजनक आहेत.'' 

सेहवागने देखील शास्त्री यांची खिल्ली उडवताना "परदेशात संघाने मैदानात सर्वोत्तम कामगिरी करायची असते, ड्रेसिंगरूममध्ये नाही.' असे म्हटले आहे. 

शास्त्री आता लगेच आशियाई करंडकासाठी संघ सांभाळतील तेव्हा त्यांच्यासमोर 19 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याचे खरे आव्हान असेल. या स्पर्धेनंतर भारतीय संघ भारतात वेस्ट इंडिजशी खेळेल आणि नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. 

भारतीय संघ रवाना 
इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरी मागे ठेवत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गुरुवारी आशियाई करंडकासाठी दुबईला रवाना झाला. भारतात असणारे खेळाडू आज रवाना झाले असून, इंग्लंड दौऱ्यावर असणारे खेळाडू त्यांना नंतर येईन मिळतील, असे "बीसीसीआय'ने म्हटले आहे. भारताची सलामीची लढत 18 सप्टेंबरला पात्रता फेरीतून आलेल्या हॉंकॉंगशी होणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या