राष्ट्रीय विक्रमासह अनू भालाफेकीच्या अंतिम फेरीत 

नरेश शेळके 
Monday, 30 September 2019

जागतिक मैदानी स्पर्धेत इतर भारतीय ऍथलिट्‌स पहिल्याच किंवा पात्रता फेरीत गारद होत असताना 27 वर्षीय अनू राणीने भालाफेकीत नवीन राष्ट्रीय विक्रमासह अंतिम फेरी गाठून दिलासा दिला.

दोहा - जागतिक मैदानी स्पर्धेत इतर भारतीय ऍथलिट्‌स पहिल्याच किंवा पात्रता फेरीत गारद होत असताना 27 वर्षीय अनू राणीने भालाफेकीत नवीन राष्ट्रीय विक्रमासह अंतिम फेरी गाठून दिलासा दिला. मिश्र रिले संघानंतर अंतिम फेरी गाठणारी ती या स्पर्धेतील पहिली भारतीय ठरली. 

त्याचप्रमाणे जागतिक स्पर्धेत फिल्ड इव्हेंटमध्ये (फेकी व उडी) अंजू जॉर्ज आणि नीलम जसंवत सिंगनंतर तिसरी खेळाडू होय. मार्च महिन्यात पतियाळा येथे फेडरेशन करंडक स्पर्धेत 62.34 मीटरचा राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या अनूने येथे 62.43 अंतरावर भाला भिरकावला आणि नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. या कामगिरीमुळे ती पात्रता फेरीत "अ" गटात तिसरी आली. 

अंतिम फेरीसाठी तिला "ब" गटाची स्पर्धा संपण्याची वाट पहावी लागली. कारण दोन्ही गट मिळून सर्वोत्तम बारा जणी अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार होत्या. "ब" गटातील फक्त दोघींनीच तिच्यापेक्षा अधिक फेक केल्याने अखेर ती पाचव्या क्रमांकाने अंतिम फेरीत पोहचली. 

महिलांच्या चारशे मीटर शर्यतीत अंजली देवीला प्राथमीक फेरीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने 52.33 सेकंद अशी संथ वेळ दिली. दोनशे मीटरमध्ये अर्चना सुसींद्रन आठ स्पर्धकांत आठवी आली आणि पहिल्याच फेरीतून बाहेर पडली.


​ ​

संबंधित बातम्या