टेनिस संघ निवडीवरून आता वादंगाच्या रॅलीज

वृत्तसंस्था
Wednesday, 6 November 2019

- डेव्हीस करंडक लढत पाकिस्तानातून हलवण्यात आल्यानंतर आता अखिल भारतीय टेनिस संघटनेत संघनिवडीवरून संघर्षाच्या रॅलीज सुरू झाल्या आहेत. 

- पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यामुळे राजपाल यांची न खेळणारे कर्णधार म्हणून निवड झाली आणि दुय्यम खेळाडूंचा संघ पाठवण्याचा निर्णय झाला होता. आता संघनिवडीचा पेच निर्माण झाला आहे.

मुंबई / नवी दिल्ली - भाजपचे नेते रोहित राजपाल यांची पाकिस्तानविरुद्धच्या डेव्हीस करंडक टेनिस लढतीसाठी न खेळणारे कर्णधार म्हणून निवड केल्यानंतर काही तासांतच लढत पाकिस्तानातून हलवण्यात आली, त्यामुळे आता अखिल भारतीय टेनिस संघटनेत संघनिवडीवरून संघर्षाच्या रॅलीज सुरू झाल्या आहेत. 
कर्णधार महेश भूपती आणि अव्वल खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यामुळे राजपाल यांची न खेळणारे कर्णधार म्हणून निवड झाली आणि दुय्यम खेळाडूंचा संघ पाठवण्याचा निर्णय झाला होता. आता संघनिवडीचा पेच निर्माण झाला आहे. 
राजपाल हेच निवड समितीचे अध्यक्ष होते. त्यांची आता न खेळणारे कर्णधार म्हणून निवड कशी झाली, हा प्रश्‍नच आहे. पण आता राजपाल पाकिस्तानला जाणाऱ्या संघातील काही खेळाडूंचा तरी त्रयस्थ ठिकाणी होणाऱ्या लढतीसाठी समावेश असावा यासाठी आग्रही आहेत. रोहन बोपण्णाने त्यातच महेश भूपती कसे कर्णधार नाहीत, अशी विचारणा करीत वाद अधिकच वाढवला आहे. 
दिवीज शरण आणि प्रज्ञेश गुणेश्‍वरन यांचे डेव्हिस लढतीच्या कालावधीतच लग्न आहे, त्यामुळे त्यांनी अनुपलब्धता कळवली आहे. पाकिस्तानबाहेर लढत असल्याचे समजताच रोहन बोपण्णा, सुमीत नागल, रामकुमार रामनाथन आणि शशिकुमार मुकुंद यांनी आपली उपलब्धता कळवली आहे. अमेरिकन स्पर्धेत रॉजर फेडररविरुद्ध सेट जिंकलेल्या नागलच्या उपलब्धतेविषयी उलटसुलट चर्चा आहे. एकंदरीत संघनिवडीचे वादंग सध्या नुकतेच सुरू झाले असल्याची भावना आहे. 


​ ​

संबंधित बातम्या