विश्‍वकरंडक संघ निवडीची सेमीफायनल; विराटचे पुनरागमन अपेक्षित 

वृत्तसंस्था
Friday, 15 February 2019

रोहितला विश्रांती दिल्यास सलामीसाठी कोणाला निवडायचे, हा प्रश्‍न निवड समितीसमोर असेल. सद्यःस्थितीत के. एल. राहुलची निवड अपेक्षित आहे. पृथ्वी शॉ तंदुरुस्त असेल, तर त्याचाही विचार होऊ शकेल; पण ऑस्ट्रेलियातील सराव सामन्यात पायाला दुखापत झाल्यानंतर तो अद्याप एकही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही.

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होत असलेल्या ट्‌वेन्टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी उद्या (ता. 15) मुंबईत संघ निवड होत आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वीची ही अखेरची मालिका असल्यामुळे निवड समितीसाठी ही एकप्रकारे "सेमीफायनल' असणार आहे. या मालिकेनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी प्रथम संभाव्य आणि नंतर मुख्य संघांची निवड होईल. 

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दौऱ्यातून निवड समितीने विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर सर्व पर्याय तपासण्यास सुरवात केली. मायदेशातील कांगारूंविरुद्धच्या मालिकेतून त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न होईल. सातत्याने खेळत असलेल्या काही खेळाडूंना विश्रांती आणि सलामी, तसेच मधल्या फळीसाठी आणखी एखादा पर्याय तपासला जाईल; पण ज्या खेळाडूंना संधी मिळेल, त्यांचा विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निश्‍चित विचार होईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अंतिम काही सामन्यांतून विश्रांती घेणारा विराट कोहली, तसेच कसोटी मालिकेनंतर विश्रांती देण्यात आलेला जसप्रीत बुमराचे पुनरागमन अपेक्षित आहे. रोहित शर्माची विश्रांती निश्‍चित आहे. 

रोहितला विश्रांती दिल्यास सलामीसाठी कोणाला निवडायचे, हा प्रश्‍न निवड समितीसमोर असेल. सद्यःस्थितीत के. एल. राहुलची निवड अपेक्षित आहे. पृथ्वी शॉ तंदुरुस्त असेल, तर त्याचाही विचार होऊ शकेल; पण ऑस्ट्रेलियातील सराव सामन्यात पायाला दुखापत झाल्यानंतर तो अद्याप एकही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही.

अंबाती रायुडूचे मधल्या फळीतील स्थान निश्‍चित आहे. केदार जाधवनेही उपयुक्तता सिद्ध केली आहे. दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत यांच्याबाबत निवड समिती अजूनही विचार करीत आहे; पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेसाठी दोघेही संघात असतील. 
प्रथम ट्‌वेन्टी-20 मालिका होणार आहे. धोनी सातत्याने खेळत असल्यामुळे आणि नंतर आयपीएलही खेळायची असल्यामुळे ट्‌वेन्टी-20 मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात येईल. त्यामुळे कार्तिकने यष्टिरक्षण केले, तर पंतला फलंदाज म्हणून खेळवण्यात येईल. 

मधल्या फळीसाठी शोध? 
विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी संघ निवड जवळपास निश्‍चित असली, तरी मधल्या फळीसाठी राखीव खेळाडूंचा पर्याय तपासला जाऊ शकतो. विश्‍वकरंडक स्पर्धा इंग्लंडमध्ये होत असल्यामुळे अजिंक्‍य रहाणे उपयोगी ठरू शकतो. कदाचित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा विचार होऊ शकतो. 

खलील की जयदेव? 
बुमरा, महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमारच्या जोडीला आणखी एक वेगवान गोलंदाज आवश्‍यक आहे. त्यासाठी खलील अहमदला सर्वाधिक पसंती असेल. तो सातत्याने संघाबरोबर आहे. रणजी अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणाऱ्या सौराष्ट्राचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचाही पर्याय उद्या तपासला जाऊ शकतो. 

तिसरा फिरकी गोलंदाज कोण? 
फिरकीसाठी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलची विश्‍वकरंडक वारी निश्‍चित आहे. इंग्लंडमध्ये आणखी एक फिरकी गोलंदाज लागण्याची शक्‍यता कमी असली, तरी पर्याय तयार ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत रवींद्र जडेजा किंवा अक्षर पटेल किंवा एखादा नवा पर्याय निवड समिती तपासण्याची शक्‍यता आहे. ऑस्ट्रेलियात जडेजाची जादू चालली नव्हती, याचाही विचार उद्या होऊ शकतो. 


​ ​

संबंधित बातम्या