इंग्लंड नव्हे, करणने केले त्रस्त : शास्त्री 

वृत्तसंस्था
Friday, 14 September 2018

इंग्लंड दौऱ्याचा निकाल पराभव दिसत असला, तरी आम्ही दाखविलेली लढाऊ वृत्ती सर्वांनाच माहीत आहे. खेळाडूदेखील हे जाणून आहेत. त्यामुळे पूर्ण अपयश आले, असे मी मानत नाही. 
- रवी शास्त्री, भारताचे मार्गदर्शक 

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यातील अपयशानंतर होणाऱ्या चौफेर टीकेकडे दुर्लक्ष करत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कसोटी मालिकेत इंग्लंड संघाने नव्हे, तर सॅम करणच्या अष्टपैलू कामगिरीने आम्हाला त्रस्त केले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

शास्त्री यांनी टीकाकारांचा थेट उल्लेख केला नसला, तरी त्यांचे आरोप फेटाळून लावत आम्ही पूर्ण अपयशी ठरलो नाही, ही भूमिका कायम ठेवली. ते म्हणाले, ""आम्ही पूर्ण अपयशी ठरलो, असे मी कधीच म्हणणार नाही. आम्ही प्रयत्न जरूर केले. पण आम्हाला यश आले नाही. मालिकेत आमच्याही काही जमेच्या बाजू आहेत. त्याचे श्रेय आम्हाला द्यायलाच हवे.'' 

करणचे कौतुक करताना मात्र शास्त्री थकत नव्हते. ते म्हणाले, ""पहिल्या कसोटीत इंग्लंड 7 बाद 87 अशा संकटात असताना त्याने धावा केल्या. चौथ्या कसोटीत पुन्हा 6 बाद 86 अशा कठीण परिस्थितीतून करणने इंग्लंडला बाहेर काढले. एजबस्टनमध्ये सलामीच्या जोडीला लय गवसली होती. तेव्हा त्याने विकेट मिळविल्या. इंग्लंडला आवश्‍यक असताना त्याने आपली उपयुक्तता दोन्ही आघाड्यांवर सिद्ध केली.'' 

इंग्लंड दौऱ्याचा निकाल पराभव दिसत असला, तरी आम्ही दाखविलेली लढाऊ वृत्ती सर्वांनाच माहीत आहे. खेळाडूदेखील हे जाणून आहेत. त्यामुळे पूर्ण अपयश आले, असे मी मानत नाही. 
- रवी शास्त्री, भारताचे मार्गदर्शक 


​ ​

संबंधित बातम्या