Asian Games 2018 : भारतीय कबड्डी वर्तुळातून नाराजीची प्रतिक्रिया

वृत्तसंस्था
Friday, 24 August 2018

आपण हरलो यावर अजूनही माझा विश्‍वासच बसत नाही. खरोखरच हे घडले हे स्वीकारण्यास काहीसा वेळ जावा लागेल. या पराभवाचे नक्कीच दूरगामी परिणाम होतील. या स्पर्धेत आपल्याला दक्षिण कोरियानेही पराजित केले.

मुंबई : आशियाई क्रीडा कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात आलेल्या अपयशाचे दूरगामी परिणाम होतील, असा इशारा भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार अनुप कुमारने दिला. 

आपण हरलो यावर अजूनही माझा विश्‍वासच बसत नाही. खरोखरच हे घडले हे स्वीकारण्यास काहीसा वेळ जावा लागेल. या पराभवाचे नक्कीच दूरगामी परिणाम होतील. या स्पर्धेत आपल्याला दक्षिण कोरियानेही पराजित केले. हा पराभव एक अपघात होता असे समजून चालत नाही. या नव्या अपघाताने तर आपल्याला पूर्वतयारीकडे जास्त लक्ष द्यायला हवे याची जाणीव झाली असेल. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेस कधीही कमी लेखून चालत नाही. विश्‍वकरंडकाची पूर्वतयारी आतापासून करायला हवी, असे अनुपने सांगितले. 

इराणी खेळाडू प्रो कबड्डी लीगमध्ये आल्याने त्यांचा खेळ उंचावला; पण आपल्याला आपला खेळ उंचावण्यात अपयश आले असे सांगतानाच, "अजय खूप वेळ मैदानाबाहेर असल्याचा फटका बसला. पहिल्या पाच मिनिटांत चांगला खेळ केला होता. त्यानंतर काय झाले तेच मला कळले नाही. आपल्या हाराकिरीचाच फटका बसला. दोन सुपर टॅकल्सनी प्रतिकाराची आशाच संपली,'' असे अनुपने सांगितले. 

नियोजन चुकले, सदोष आक्रमणही भोवले 
पराभवाचे दुःख खूपच आहे; पण आक्रमणात केलेल्या चुका आपल्याला भोवत आहेत. सुपर टॅकल्सना या स्पर्धेत आपण सामोरे जात होतो, तरीही त्यावर मात करण्यात अपयशी ठरलो, अशी टीका माजी कर्णधार राकेश कुमारने केली. आपल्या आक्रमणाचा भर कायम थर्ड रेडवरच का होता ते कळले नाही. त्यातून आपण दडपण ओढवून घेतले. मोनू आणि रिषांक देवाडिगाने चढाईत केलेल्या चुकांचा फटका बसला. इराणचे दोघेच असताना एकाच भागात आक्रमण कसे होते. दोघांवरही सारखेच लक्ष हवे, अशी विचारणाही राकेशने केली. 


​ ​

संबंधित बातम्या