विश्‍वकरंडक पात्रता फेरीत खेळण्याचे दडपण नाही

वृत्तसंस्था
Wednesday, 21 August 2019

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या आशियाई पात्रता फेरीचे दडपण अजिबात नाही. कुठल्याही प्रतिस्पर्ध्यांशी खेळायला भारतीय खेळाडू सज्ज असल्याचा विश्‍वास भारताचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग याने व्यक्त केला. 

कोलकता - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या आशियाई पात्रता फेरीचे दडपण अजिबात नाही. कुठल्याही प्रतिस्पर्ध्यांशी खेळायला भारतीय खेळाडू सज्ज असल्याचा विश्‍वास भारताचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग याने व्यक्त केला. 

विश्‍वकरडंक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पात्रता फेरीसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारताचा पहिला सामना गुवाहाटीत ओमानशी होणार आहे. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी ते आशियाई विजेते कतारशी खेळणार आहेत. गेल्याच आठवड्यात ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या  गुरप्रीतचा विश्‍वास कमालीचा उंचावलेला होता. तो म्हणाला, ‘‘पहिल्या दोन लढती आव्हानात्मक असल्या तरी कठीण नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना प्रत्येक सामना कठीण असतो. आमची तयारी चांगली सुरू आहे. आम्हाला फक्त गुणवत्तेला न्याय द्यायचा आहे आणि पूर्ण ताकदीने खेळायचे आहे.’’

भारतीय संघ अन्य लढतींकडे कसा बघतोय, असे विचारले असता गुरप्रीत म्हणाला, ‘‘आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक सामना कठीण असतो. काय होईल याचा अंदाज वर्तवणे तितकेच कठीण आहे; पण आम्ही सर्वस्व पणाला लावून सर्वोत्तम खेळ करू. यापूर्वीदेखील आम्ही आमची क्षमता दाखवून दिली आहे. तुल्यबळ संघांनाही आम्ही यापूर्वी झुंजवले आहे.’’

‘फिफा’ क्रमवारीत भारतीय संघ १०३व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी विश्‍वकरंडक पात्रता फेरीत भारतीय संघ ओमानकडून दोन्ही सामने हरला होता. मात्र, आता नवे प्रशिक्षक स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडू आपले सर्वस्व एकवटून सराव करत आहेत. नव्या प्रशिक्षकांच्या नव्या कल्पनांशी जुळवून घेत गेल्या पाच सामन्यांत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याचे गुरप्रीतने सांगितले.

यापूर्वी काय मिळविले, हे माहीत आहे. आता जे मिळविले नाही, ते मिळवायचे आहे. आपल्यासमोर काय आव्हाने आहेत, याचा आम्ही विचार करीत आहोत.
गुरप्रीतसिंग, भारताचा गोलरक्षक
 


​ ​

संबंधित बातम्या