क्रीडा पुरस्कार सोहळ्यास विराट कोहलीमुळे झळाळी 

वृत्तसंस्था
Tuesday, 25 September 2018

जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या कोहलीस 2013 मध्ये अर्जुन आणि गतवर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या रंगीत तालमीसाठी अनुपस्थित राहिलेला विराट कोहलीच या कार्यक्रमाचा स्टार ठरला. त्याची स्टार पत्नी अनुष्का शर्माही कार्यक्रमास उपस्थित असल्याने कार्यक्रमाची झळाळी जास्तच वाढली. 

राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यास कोहली उपस्थित राहणार का, याबाबत साशंकता होती. यापूर्वीचा खेलरत्न पुरस्कार विजेता क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी कार्यक्रमास आला नव्हता. त्यातच कोहली सोमवारी झालेल्या कार्यक्रमाच्या रंगीत तालमीसाठी आलाच नाही; मात्र कोहलीने हा पुरस्कार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यातच स्वीकारला. या कार्यक्रमास पत्नी अनुष्का, आई सरोज कोहली आणि भाऊ विकासही आले होते. 

जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या कोहलीस 2013 मध्ये अर्जुन आणि गतवर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 

कोहलीप्रमाणेच खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेल्या मीराबाई चानू हिने गतवर्षी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. खेलरत्न पुरस्कार साडेसात लाखांचा आहे, तर अर्जुन पुरस्कार विजेत्यांना पाच लाखांचे बक्षीस देण्यात येते. कुस्तीगीर बजरंग पुनियाने खेलरत्न पुरस्कार नाकारल्याबद्दल न्यायालयात जाण्याचे ठरवले होते; मात्र क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांच्या भेटीनंतर आपला निर्णय बदलला असल्याचे सांगितले जात आहे. 

तिरंदाज मार्गदर्शक जीवनज्योत तेजा यांच्या राजीनाम्यामुळे जास्त चर्चेत आलेला द्रोणाचार्य पुरस्कार आठ मार्गदर्शकांना देण्यात आला. श्रीलंका दौऱ्यावर असलेली स्मृती मानधना सोडल्यास सर्वच पुरस्कारार्थी उपस्थित होते.

संबंधित बातम्या