स्मिथला मागे टाकून विराट बनला कसोटीत अव्वल

वृत्तसंस्था
Sunday, 5 August 2018

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकाविले होते. त्याच्या याच खेळीच्या जोरावर त्याने कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकाविले. विक्रमामागून विक्रम करणाऱ्या कोहलीने आता हाही विक्रम केला आहे.

एजबस्टन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथला मागे टाकून पहिले स्थान मिळविले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर क्रमवारीत पहिले स्थान मिळविणारा विराट पहिला खेळाडू ठरला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकाविले होते. त्याच्या याच खेळीच्या जोरावर त्याने कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकाविले. विक्रमामागून विक्रम करणाऱ्या कोहलीने आता हाही विक्रम केला आहे. या क्रमवारीत जून 2011 मध्ये सचिनने पहिले स्थान मिळविले होते. त्यानंतर विराटने ही कामगिरी केली आहे. गेल्या सात वर्षांमध्ये एकही भारतीय क्रिकेटपटूला ही कामगिरी करण्यात यश आले नव्हते.

आयसीसीने आज प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीनुसार विराटने 934 गुणांसह पहिले स्थान मिळविले. तर, स्टिव्ह स्मिथ 929 गुणांसह दुसऱ्या आणि इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट 865 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विराट व्यतिरिक्त या क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये भारताचा चेतेश्वर पुजारा आहे. पुजारा 791 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. विराटशिवाय फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत आतापर्यंत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गौतम गंभीर, सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग आणि दिलीप वेंगसरकर यांनी ही कामागिरी केलेली आहे.

संबंधित बातम्या