भारतीय गोलंदाजांचे परकीय भूमीवर वाढते वर्चस्व

वृत्तसंस्था
Saturday, 25 August 2018

उमेश यादवचा वेग, भुवनेश्वरचा स्विंग, बुमराचे यॉर्कर, अश्विनचा ऑफ स्पिन, ईशांत शर्माचे आखूड टप्प्याचे चेंडू यांमुळे फलंदाजांच्या मनात भीती निर्माण होते. यामुळे गेल्या काही वर्षांत परदेशी खेळपट्ट्यांवर भारतीय संघ वर्चस्व गाजवू लागला आहे.

लंडन : एकेकाळी गोलंदाजी ही भारतीय कसोटी संघाची लंगडी बाजू होती; मात्र गेल्या काही वर्षींमध्ये हीच लंगडी बाजू भारताची ताकद बनली आहे. गेल्या सहापैकी पाच कसोटींमध्ये भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांचे 20 बळी घेतले आहेत. या पाच सामन्यांत त्यांनी एकूण 100 बळी घेतले आहेत. 

भारताने यंदाच्या वर्षात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन आणि इंग्लंडविरुद्ध तीन असे एकूण सहा सामने खेळले आहेत. या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यात भारताने प्रतिस्पर्धी संघाचे सर्व फलंदाज बाद केले आहेत. इंग्लंडने लॉर्ड्सवरील सामना घोषित केल्याने भारताला या सामन्यात त्यांच्या सर्व फलंदाजांना बाद करण्याची संधी मिळाली नाही. 

विराट कोहलीने 2015 मध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्याने संघात गोलंदाजांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संघातील फलंदाज कमी झाले आणि त्यामुळे भारताला सुरवातीला त्याचा फटकाही बसला. मात्र नंतर याच निर्णयाने भारताला अनेक विजय मिळवून दिले. भारतीय संघाचे मार्गदर्शक रवी शास्त्री यांनी ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम गोलंदाजी असल्याचेही नुकतेच सांगितले होते.

भारताने 1986 इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली होती. त्या भारतीय संघाविरुद्ध खेळलेल्या डेव्हिड गोव्हर आणि मायकेल होल्डिंग यांनी भारतीय गोलंदाजीतील उणीवा स्पष्ट केल्या होत्या. ते म्हणाले, ''इंग्लंडमधील वातावरण अनुकूल असूनही भारतीय गोलंदाजी आमच्या मनात धडकी भरविण्यात अपयशी ठरले. कपिलकडे उत्तम स्विंग असूनही तो वेगात कमी पडायचा आणि दिवसभर फ्रंटफूटवर मदन लालची गोलंदाजी खेळेणे फार सोपे होते.'' 

सध्याच्या भारतीय गोलंदाजीत नेमका हाच बदल झाला आहे. ईशांत शर्मा, महंमद शमी, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमरा, हार्दिक पंड्या, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांच्यात आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना रोखण्याचे बळ आहे. 

उमेश यादवचा वेग, भुवनेश्वरचा स्विंग, बुमराचे यॉर्कर, अश्विनचा ऑफ स्पिन, ईशांत शर्माचे आखूड टप्प्याचे चेंडू यांमुळे फलंदाजांच्या मनात भीती निर्माण होते. यामुळे गेल्या काही वर्षांत परदेशी खेळपट्ट्यांवर भारतीय संघ वर्चस्व गाजवू लागला आहे.


​ ​

संबंधित बातम्या