शंभर वर्षांपूर्वीचा विक्रम भारतीय गोलंदाजांनी मोडला

वृत्तसंस्था
Friday, 31 August 2018

 यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय वेगवान गोलंदाजी चांगलीच बहरली आहे. यापूर्वी 'वेगवान गोलंदाजी' हा भारतीय संघातील कमकुवत दुवा होता; पण अलीकडच्या तीन-चार वर्षांमध्ये हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. किंबहुना, सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी काही विक्रमही मोडीत काढले आहेत. 

लंडन : यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय वेगवान गोलंदाजी चांगलीच बहरली आहे. यापूर्वी 'वेगवान गोलंदाजी' हा भारतीय संघातील कमकुवत दुवा होता; पण अलीकडच्या तीन-चार वर्षांमध्ये हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. किंबहुना, सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी काही विक्रमही मोडीत काढले आहेत. 

आतापर्यंतच्या तीन कसोटींमध्ये मिळून भारताच्या वेगवान गोलंदाजांनी 44.2 च्या स्ट्राईक रेटने विकेट्‌स मिळविल्या आहेत. इंग्लंडमध्ये पाहुण्या संघाच्या वेगवान गोलंदाजांची गेल्या शंभर वर्षांतील हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे. शिवाय, झिंबाब्वे वगळता आशिया खंडाच्या बाहेर भारतीय वेगवान गोलंदाजांची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 

नव्या चेंडूवर भारताचा मारा किती भेदक आहे, याचे आणखी एक उदाहरण या मालिकेत पाहायला मिळाले. इंग्लंडच्या पहिल्या चार फलंदाजांची या मालिकेतील सरासरी केवळ 17.70 आहे. कर्णधार ज्यो रूटचा अपवाद वगळता इतर प्रमुख फलंदाजांची सरासरी 20 पेक्षा कमी आहे. त्यातही, रूटने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 80 धावा केल्या होत्या; त्यापुढच्या पाच डावांमध्ये 66 धावाच केल्या आहेत. भारतीय वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांना कसे जखडून ठेवले, हेच यातून सिद्ध होत आहे. 

भारतीय क्रिकेट संघ नेहमीच फलंदाजांवर अवलंबून राहिला आहे. मात्र, यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात गोलंदाजांनीही प्रभाव पाडला आहे. या मालिकेत प्रथमच पाच गोलंदाजांनी दहा किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्‌स घेतल्या आहेत. ईशांत शर्माने 13 विकेट्‌स घेतल्या आहेत; तर जसप्रित बुमरा, हार्दिक पांड्या, आर. आश्‍विन आणि महंमद शमी यांनी प्रत्येकी दहा विकेट्‌स घेतल्या आहेत. 

वेगवान गोलंदाजांची इंग्लंडमधील सर्वोत्तम कामगिरी 
मालिका : स्ट्राईक रेट 
पतौडी करंडक (भारताचा इंग्लंड दौरा, 2018) : 44.2 
ऍशेस (ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, 1997) : 45 
पाकिस्तानचा इंग्लंड दौरा, 2018 : 45.5 
ऍशेस (ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, 2015) : 46.6 
दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा, 2017 : 47.5


​ ​

संबंधित बातम्या